Thu, Jul 18, 2019 05:09होमपेज › Kolhapur › रिव्हॉल्व्हर दाखवून राजकीय पक्षासाठी फ्लॅटची मागणी

रिव्हॉल्व्हर दाखवून राजकीय पक्षासाठी फ्लॅटची मागणी

Published On: Feb 05 2018 1:30AM | Last Updated: Feb 05 2018 12:51AMकोल्हापूर : प्रतिनिधी

बांधकाम व्यावसायिकाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून राजकीय पक्षाच्या कार्यालयासाठी फ्लॅटची मागणी केल्याप्रकरणी सूरज साखरे (रा. लक्षतीर्थ वसाहत), राजेंद्र कासेगावकर याच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फ्लॅट देण्यास नकार दिल्याने इमारतीतील साडेसात लाखांचे साहित्य चोरून नेल्याची फिर्याद धीरज अनिल साखळकर (वय 33, रा. शनिवार पेठ) यांनी राजवाडा पोलिसात दिली. 

बांधकाम व्यावसायिक धीरज साखळकर यांनी देवकर पाणंद येथे कश्यप हाईट्स अपार्टमेंटचे काम केले. 2016 मध्ये संशयित सूरज साखरे व राजेंद्र कासेगावकर यांनी फ्लॅट नं. 107 व 108 यांचे खरेदीपत्राचे अ‍ॅग्रीमेंट टू सेल दुय्यम निबंधक कार्यालयात केले. या फ्लॅटसाठी दोघांनी साखळकर यांना पाच लाख व चार लाखांचे धनादेश दिले; पण हे धनादेश वटले नाहीत. हे फ्लॅट नावावर करण्यासाठी दोघांनी साखळकर यांना दमदाटी केली. 

सप्टेंबर 2017 मध्ये याच अपार्टमेंटमध्ये एका राजकीय पक्षाच्या कार्यालयासाठी सूरज साखरे याने फ्लॅटची मागणी केली. याला नकार दिल्याने साखळकर यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून दम भरला. या मागणीला साखळकर नकार देत असल्याच्या रागातून सूरज साखरे आणि त्याच्या साथीदारांनी कश्यप अपार्टमेंटमधील सात लाख रुपये किमतीचे वाळू, सिमेंट, प्लायवूड, इलेक्ट्रिक साहित्य, प्लम्बिंग साहित्य चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयित सूरज साखरे याने फ्लॅट खरेदीच्या नावाखाली नऊ लाखांची फसवणूक केल्याचे तसेच साहित्याच्या तोडफोडीद्वारे चार लाख, तर बांधकाम साहित्य नेऊन सात लाख असे सुमारे 20 लाखांचे नुकसान केल्याची फिर्याद धीरज साखळकर यांनी दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक अनिल गुजर करीत आहेत.