Fri, Feb 28, 2020 16:25होमपेज › Kolhapur › Flashback 2017: कोल्हापूरकरांनी गाजवले ‘मैदान’; कुस्तीत निराशाच

Flashback 2017: कोल्हापूरकरांनी गाजवले ‘मैदान’

Published On: Dec 31 2017 3:43PM | Last Updated: Dec 31 2017 8:33PM

बुकमार्क करा
धनाजी सुर्वे : पुढारी ऑनलाईन

क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर कायम चमकदार कामगिरी करणाऱ्या कोल्हापूरच्या खेळाडूंनी २०१७मध्येही आपल्या कामगिरीत सातत्य ठेवले आहे. किंबहुना या वर्षी कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राची कामगिरी उंचावली आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना, या खेळाडूंच्या कामगिरीची दखल घ्यावीच लागणार आहे. पण, कुस्तीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातील पैलवानांनी यंदाही निराशा केली आहे. महाराष्ट्र केसरीच्या गदेने यंदाही कोल्हापूरला हुलकावणी दिली असून, वर्षाचा निरोप घेताना ही हुरहुर कोल्हापूरच्या क्रीडा प्रेमींना लागून राहिली आहे. 

कोल्‍हापूरला जसा सामाजिकतेचा वारसा आहे तसाच वारसा येथे क्रीडा परंपरेला आहे. समाज, साहित्‍य, संस्‍कृती आणि राजकारणातही अनेक नवनवे बदल घडत आहेत. लाल मातीत खेळणारा येथील पैलवान जेव्‍हा आंतरराष्ट्रीय पातळीवर कुस्‍ती खेळतो तेव्‍हा तो लाल मातीची वेगळी मजा असल्याचे सांगतो. कुस्‍तीप्रमाणेच कोल्‍हापूरच्या अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव कोरले आहे. म्‍हणूनच येथील वीरधवल खाडे, सुहास खामकर यांच्याप्रमाणे अनेक खेळाडूंनी कोल्‍हापूरचे नाव कोरले आहे. त्‍याचाच हा आढावा.

राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत राजवीर जाधवने कांस्यपदक जिंकले.

राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत राजवीर योगेश जाधवने १४ वर्षाखालील वैयक्तिक आणि सर्वसाधारण गटात कांस्यपदक पटकावले. त्याने १४ वर्षाखालील कंपाऊड राऊंड या प्रकारात ही भरीव कामगिरी केली. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने रायपूर येथे या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राजवीर हा शांतिनिकेतनचा विद्यार्थी आहे. 

Image may contain: 1 person

जयश्री बोरगेचा ॲथलेटिकमध्येनवीन विक्रम

धावपटू जयश्री बोरगेने औरंगाबाद येथे झालेल्‍या २९ व्या महाराष्‍ट्र राज्‍य पोलिस क्रीडा स्‍पर्धेत १५०० मीटर धावण्याच्या स्‍पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. तिने या कामगिरीसोबतच २०१६ मधील ४ :३७:०१ सेकंदाचा विक्रम मोडीत काढत ४ :३४: ०४ नवीन विक्रम करत या स्‍पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. 

पॉवरलिफ्टिंगमध्ये अजिंक्‍य चौगुलेला‘सुवर्ण’ पदक

गडहिंग्‍लज (जि. कोल्‍हापूर) येथील शिवराज महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग आणि शरीसौष्‍ठव स्‍पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्‍पर्धेत अजिंक्‍यने ९३ किलो गटात सुवर्ण पदक पटकावले. अजिंक्‍य हा शिवराज महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. 

बुध्दिबळ स्‍पर्धेत ॠचा पुजारीची बाजी
राष्‍ट्रीय बुध्दिबळ स्‍पर्धेत ॠचा पुजारीला ‘सुवर्ण’पदक
मध्ये प्रदेश चेस असोशिएशन आणि अखिल भारतीय बुध्दिबळ महासंघ यांच्या वतीने भोपाळ येथे झालेल्‍या १५ व्या राष्‍ट्रीय महिला बुध्दिबळ स्‍पर्धेत ॠचा पुजारीने सुवर्ण पदक पटकावले. ॠचाच्या एअरपोटस ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या संघाने ७ पैकी ६ गुण मिळवत रौप्यपदक पटकावले. तर, ५ पैकी ४.५ गुण मिळवत ॠचाने वैयक्‍तिक सुवर्ण पदक मिळवले.

ॠचा आंतरराष्‍ट्रीय मास्‍टर
रशियातील मास्‍को येथे झालेल्‍या आंतरराष्‍ट्रीय स्‍पर्धेत दिमाखदार कामगिरी करत ॠचाने आंतरराष्‍ट्रीय मास्‍टरचा नॉर्म पटकावला. या स्‍पर्धेत तिने ४६ गुण मिळवले. जागतिक बुध्दिबळ महासंघाकडून अत्‍यंत प्रतिष्‍ठेचा समजला जाणारा महिला आंतरराष्‍ट्रीय मास्‍टर हा पुरस्‍कारही तिने पटकावला. 

हरियाणा येथील कुस्‍ती स्‍पर्धेत रेश्मा मानेला रौप्यपदक
हरियाणामधील शिरसा येथे झालेल्‍या अखिल भारतीय विद्यापीठ कुस्‍ती स्‍पर्धेत कुस्‍तीपटू रेश्मा माने (रा. वडणगे) हिने रौप्यपदक पटकावले. औरंगाबादच्या ज्‍योती कापसे, भावनगरच्या सर्वय्या, भरतपूरच्या लक्ष्मी राणा आणि कर्नाटक युनिव्हर्सिटीच्या मोनिया यांचा पराभव करून रेश्माने उपांत्‍यफेरीत धडक मारली. उपांत्‍य फेरीच्या लढतीत रेश्माने गुजरातच्या रिमा राजहरचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत रेश्माची लढत रोहतक (हरियाणा) येथील निशा या कुस्‍तीपटूशी झाली. रेश्माने या फेरित पहिल्‍यापासून आघाडी घेतली होती. मात्र, शेवटच्या काही सेकंदात वरचा भारंदाज फिरवण्याच्या प्रयत्‍ना असताना निशाने रेश्माला चितपत केले. त्‍यामुळे रेश्माचे सुवर्णपदक थोडक्‍यात हुकले. 

आशियाई स्‍पर्धेत रेश्माला कांस्‍यपदक
तैवान येथे झालेल्‍या ज्‍युनिअर आशियाई कुस्‍ती स्‍पर्धेत ६३ किलो वजन गटात रेश्माने कांस्‍यपद पटकावले. 

मास्‍टर्स नेमबाजी स्‍पर्धेत अनुष्‍का पाटीलला ‘सुवर्ण’
सरदार सज्‍जनसिंग स्‍मृती मास्‍टर्स नेमबाजी स्‍पर्धेत आंतरराष्‍ट्रीय नेमबाज अनुष्‍का पाटीलने ज्‍युनिअर गटात दहा मीटर एअर पिस्‍टल प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. तिने २४० गूण मिळवून पंजाबच्या श्वेता यादव आणि हरियाणाच्या यशस्‍विनी देसवाल यांचा पराभव केला. 

अनुष्‍काला दिल्‍लीत दोन सुवर्ण, एक रौप्य
अनुष्‍काने दिल्‍ली येथे झालेल्‍या चौथ्‍या आंतरराष्‍ट्रीय चाचणीमध्ये दहा मीटर एअर पिस्‍टल प्रकारातीतल ज्‍युनिअर गटात एक सुवर्ण, तर महाराष्‍ट्र रायफल आसोसिएशन मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्‍या कॅप्टन एझीकल नेमबाजी स्‍पर्धेत २५ मीटर स्‍पोटर्स पिस्‍टल प्रकारात सिनिअर आणि ज्‍युनिअर गटाकत एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटाकवले.  अनुष्‍का विमला गोयंका इंग्‍लिश मीडियम स्‍कूलमध्ये शिक्षण घेत आहे. 

चिमुकल्‍या वरदचा सायकलिंगद्वारे विश्वविक्रम

साडेसहा वर्षाच्या वरद वैभव याने कोल्‍हापूर ते बेळगाव असा १२८ मिलोमीटर सलग सहा तास ३० मिनिटे सायकल चालवत विश्वविक्रम केला. युनकि बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये १ मे रोजी वरदने हा विश्वविक्रम आपल्‍या नावावर नोंदवला. बेळगाव येथून एक मे रोजी पहाटे ४ वाजता महादेव मंदिर, मिलिटरी कॅम्‍प येथून या उपक्रमाला सुरुवात केली. १२८ किलोमीटरचा  ९ तासांचा प्रवास त्‍याने सहा तास ३० मिनिटात पूर्ण केला.  

नीलम पाटीलची रग्‍बी स्‍पर्धेसाठी निवड
आशियाई रग्‍बी सेव्हन स्‍पर्धेसाठी २० वर्षाखालील भारतीय संघात निलम पाटीलची निवड झाली. ४ आणि ५ ऑगस्‍ट रोजी हाॅँगकाँग येथे या स्‍पर्धा पार पडल्‍या. निलम ही कागल तालुक्‍यातील बामणी या गावची आहे. 

कृष्‍णराज महाडिकला ‘ब्रिटिश फॉर्म्युला थ्री’मध्ये विजेतेपद
इंग्‍लंडमधील प्रष्‍ठेच्या समजल्‍या जाणाऱ्या बी. आर. डी. सी. ब्रिटिश फॉर्म्युला थ्री’ स्‍पर्धेत रेसर कृष्‍णराज धनंजय महाडिक याने विजेतेपद पटकावले.  ५ आणि ६ ऑगस्‍ट रोजी इंग्‍लंडमधील ब्रँडस हॅच ग्रँड प्रिक्‍स रेसिंग ट्रॅकवर बी. आर. डी. सी. ब्रिटिश फॉर्म्युला थ्री’ रेसिंगच्या फेरीतील दुसऱ्या रेसमध्ये कृष्‍णराज याने प्रथम क्रमांक मिळवला.

जलतरणपटू मंदार दिवसेला ५ सुवर्ण, २ रौप्य, ३ कास्‍य
अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे झालेल्‍या जागतिक पोलिस फायर क्रीडा स्‍पर्धेत मंदार दिवसे यांने चमकदार कामगिरी केली. त्‍यांने या स्‍पर्धेत ५ सुवर्ण, २ रौप्य आणि ५ कांस्‍य पदके पटकावली. १५०० आणि ४०० मीटर फ्री स्‍टाईल, २०० आणि ८०० मीटर फ्री स्‍टाईल, दोन माईस्‍ल खुल्‍या स्‍पर्धेत प्रत्‍येकी एक अशी पाच सुवर्ण पदके मिळवली. ४ बाय ५० मीटर मिडले रिले व ४ बाय ५० मीटर फ्री स्‍टाईल प्रकारात रौप्यपदके मिळवली. तर, ४ बार ५० मीटर मिक्‍सड फ्री स्‍टाईल २०० मीटर मिडले रिले प्रकारात वैयक्‍तिक कांस्‍य पदके मिळवली. 

राष्‍ट्रीय रेसिंग स्‍पर्धेत ध्रुव मोहितेला दोन चषक
राष्‍ट्रीय रेसिंग मालिकेतील ॲमिओ करंडक स्‍पर्धेत ध्रुव मोहिते याने तिसरा क्रमांक मिळवला. या स्‍पर्धेत त्‍याला २८० गुण मिळाले. 

वीरधवल खाडेला ‘सुवर्ण’पदक
भोपाळ येथे झालेल्‍या ७३ व्या जलतरण स्‍पर्धेत सलग दुसरे सुवर्णपदक पटकावले आहे. ५० मीटर बटर फ्लाय प्रकारात वीरधवलने २४.७८ इतकी वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला.

राष्‍ट्रकुल नेमबाजी स्‍पर्धेत स्‍वप्निल कुसाळेला कांस्‍य
ऑट्रेलिया येथे झालेल्‍या राष्‍ट्रकुल स्‍पर्धेसातील ५० मीटर रायफल प्रोन या नेमबाजी प्रकारात स्‍वप्निल सुरेश कुसाळे (रा. काळंबवाडी, ता. राधानगरी) याने कांस्‍य पदक मिळवले. या स्‍पर्धेत त्‍याला २२५.६ गुण मिळाले.

आंतरराष्‍ट्रीय अपंग टेबल टेनिसाठी वैशाली सुतारची निवड
थायलंड येथे झालेल्‍या आंतरराष्‍ट्रीय अपंग टेबल टेनिस स्‍पर्धेसाठी वैशाली विनायक सुतार हिची भारतीय संघात निवड झाली. मस्‍क्‍युलर डिस्‍टॉफी या आजारामुळे हाता-पायांतील कमकुवतपणामुळे वैशालीला अपंगत्‍व आले आहे.  

आंतरराष्‍ट्रीय नेमबाजीसाठी स्‍वरूपची निवड

बँकांक-थायलंड येथे झालेल्‍या आयपीसी शूटिंग वर्ल्ड कप २०१७ जागतिक स्‍पर्धेसाठी भातरीय संघातून स्‍वरूप महावीर उन्हाळकर यांची निवड झाली. दिल्‍ली येथे झालेल्‍या कुमार सुरेंद्रसिंग स्‍पर्धेत ६०९ गुण मिळवत त्‍याने सुवर्ण पदक मिळवले. त्‍याच्या या यशामुळे भारतयी संघात त्‍याचे निवड झाली. 

राष्‍ट्रीय बुध्दिबळ स्‍पर्धेसाठी श्रृती भोसलीची निवड

देवगड येथे पार पडलेल्‍या बुध्दिबळ स्‍पर्धेत १९ वर्षाखालील मुलींच्या गटात सहा पैकी साडेचार गुण मिळवत श्रृती भोसले हिने पाचवे स्‍थान पटकावले. श्रृतीच्या या यशामुळे राष्‍ट्रीय स्‍पर्धेसाठी पाच जणांच्या महाराष्‍ट्र संघात दुसऱ्यांदा निवड झाली. २०१६ मध्ये झालेल्‍या राष्‍ट्रीय बुध्दिबळ स्‍पर्धेत श्रृतीने महाराष्‍ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

‘मिस्‍टर ऑलिम्‍पिया’ स्‍पर्धेत सुहास खामकरला रौप्यपदक
हाँगकाँग येथे झालेल्‍या मिस्‍टर ऑलिम्‍पिया २०१७’ आंतरराष्‍ट्रीय स्‍पर्धेत सुहास खामकर याने ७५ ते ८० किलो वजनगटात रौप्यपदक पटकावले.  

भारतीय ‘अ’ संघाच्या कर्णधारपदी अनुजा पाटील
बांगलादेश ‘अ’ संघाविरोधातील महिलांच्या क्रिकेट मालिकेसाठी भारतीय ‘अ’ संघाच्या कर्णधारपदी अनुजा पाटील हिची निवड झाली आहे. अनुजाने याआधि विभागीय संघाचे नेतृत्‍व केले आहे. तिच्या या निवडीमुळेच आंतरराष्‍ट्रीय पातळीवर अनुजाला भारतीय संघाचे नेतृत्‍व करण्याची संधी मिळाली. 

चितेश मंडोडी राष्‍ट्रीय चॅम्‍पियन
जे. के. टायर फॉर्म्युला एलजीबी अंशनल रेसिंग चँम्‍पियनशिप २०१७ राष्‍ट्रीय स्‍पर्धेत रेसिंगपटू चिजेश सचिन मंडोडी याने दोन पॉईंटने स्‍पर्धा जिंकली. त्‍याच्या या यशामुळे त्‍याला जे. जे. टायर्सच्या वतीने २०१८ साठीच्या फॉर्म्युला बीएमडब्‍ल्‍यू चॅम्‍पियनशिपसाठीची ३० लाख रूपयांची चॅम्‍पियनशिप बहाल करण्यात आली. 

शाहू मानेची ‘युवा ऑलिम्‍पिक’साठी निवड 
जपान येथे झालेल्‍या ‘एशियन एअरगन शूटिंग चॅम्‍पियनशिप’ स्‍पर्धेत शाहू माने यांने दहा मीटर रायफल शूटिंग प्रकारात वैयक्‍तिक कांस्‍यपदक पटकावले. या यशामुळे त्‍याची युवा ऑलिंम्‍पिक स्‍पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. २०१८ मध्ये अर्जेंटिना यथे युवा ऑलिंम्‍पिक स्‍पर्धा होणार आहेत.  

विक्रीकर निरीक्षक :  महिला प्रवर्गात भिवसे प्रथम
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत प्राची सखाराम भिवसे या महिला प्रवर्गातून राज्यात प्रथम आल्या आहेत.  कोल्हापुरातील एस.एस.सी. बोर्डाजवळील पद्मा कॉलनीत राहणार्‍या प्राची भिवसे यांनी महिला प्रवर्गात प्रथम क्रमांक मिळविला आहे. भिवसे यांनी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून इलेक्ट्रॉनिक्स विषयात बी.टेक. केले आहे. जानेवारी 2015 पासून राज्यसेवा परीक्षा अभ्यासास सुरुवात केली.

संबंधित : 

Flashback 2017 : १०० कोटींमध्ये समावेश झालेले चित्रपट 

Flashback 2017 : अभिनेत्रींचे फसलेले लूक्स

Flashback 2017 : ‘या’ कलाकारांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर उमटवली मोहोर  

Flashback 2017 : या क्रिकेटपटूंना सतरावं वरीस ठरलं धोक्याचं

Flashback 2017 :  या वर्षातील 'बेस्ट मोमेंटस् ऑन फिल्ड' (व्हिडिओ)

Flashback 2017: क्रिकेटच्या पंढरीत मिताली ब्रिगेडची कमाल

Flashback 2017 : महिलांच्या सुवर्ण कामगिरीचे क्षण (व्हिडिओ)