Mon, Jul 13, 2020 02:14होमपेज › Kolhapur › पाच कोरोनामुक्‍त; जिल्ह्यात २ बाधित

पाच कोरोनामुक्‍त; जिल्ह्यात २ बाधित

Last Updated: Jun 07 2020 1:14AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात शनिवारी आणखी पाच जण कोरोनामुक्‍त झाले. आजरा तालुक्यात दोन नवे रुग्ण आढळून आले तर याच तालुक्यातील वडकशिवाले येथील 52 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 8 वर, कोरोनामुक्‍त झालेल्यांची संख्या 424 वर तर कोरोनाबाधितांची संख्या 661 वर गेली.

जिल्हा प्रशासनाला शनिवारी 115 अहवाल प्राप्त झाले. यापैकी दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हे दोन्ही रुग्ण आजरा तालुक्यातील आहेत. यापैकी एक अहवाल आज मृत्यू झालेल्या व्यक्‍तीचा आहे. दोन अहवालामुळे आजर्‍यातील एकूण बाधितांची संख्या 65 वर गेली. दरम्यान 109 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. एका पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचारानंतरचा (फॉलोअप) स्वॅब तपासणी अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. तीन रुग्णांचे नमुने नाकारण्यात आले आहेत.

जिल्ह्यात आज आणखी पाच जण कोरोनामुक्‍त झाले. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे कोरोनातून पूर्ण बरे झालेल्यांची जिल्ह्यातील एकूण संख्या 424 इतकी झाली. जिल्ह्यात कोरोनामुक्‍त होण्याचे प्रमाण शनिवारी 64 टक्क्यापर्यंत गेले. बरे होणार्‍या रुग्णांचे वाढते प्रमाण जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे.

जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचा आठवा तर आजरा तालुक्यातील सलग दुसरा बळी गेला. 15 दिवसांपूर्वी कुटुंबासह मुंबईहून आलेल्या वडकशिवाले (ता. आजरा) येथील 52 वर्षीय नागरिकाला कोरोनाची लागण झाली होती. श्वसनाचा त्रास वाढल्याने त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू होते. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला, दरम्यान, आज दुपारीच त्याचा मृत्यू झाला. सलग दोन दिवस आजरा तालुक्यात कोरोनाचे दोन बळी गेल्याने भीतीचे वातावरण आहे. दरम्यान  जिल्ह्यात सीपीआरसह विविध कोरोना केअर सेंटरमध्ये 229 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.