Thu, Nov 15, 2018 18:23होमपेज › Kolhapur › आधी अ‍ॅम्ब्युलन्सला रस्ता द्या..

आधी अ‍ॅम्ब्युलन्सला रस्ता द्या..

Published On: May 12 2018 1:28AM | Last Updated: May 12 2018 12:52AMकोल्हापूर : प्रतिनिधी

‘अ‍ॅम्ब्युलन्सला रस्ता द्या’, असे आवाहन करत स्वयंसेवी कार्यकर्ते परीख पूल, ताराराणी पुतळा या परिसरात शुक्रवारी सकाळपासून कार्यरत होते. वाहतूकदारांना थांबवून नियम पाळा आणि सुरक्षित जगा, असे सांगून जनजागृतीची एक सकारात्मक चळवळ शुक्रवारपासून सुरू झाली. या उपक्रमाचे उद्घाटन परीख पूल येथे सकाळी नऊ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

दै.‘पुढारी’ मध्ये मंगळवारच्या अंकात (दि. 8) ‘वाहतूक कोंडीने हसर्‍या सोनूचा बळी’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. अ‍ॅम्ब्युलन्सला वाट न दिल्याने एका तीन वर्षांच्या चिमुकल्याचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याच्या या घटनेने समाजमन हळहळले. अनेक संस्था व संघटनांनी वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याचा निर्धार केला. या निर्धारातून आजपासून चार संघटनांच्या वतीने अ‍ॅम्ब्युलन्सला रस्ता द्या, ही लोकप्रबोधन चळवळ सुरू करण्यात आली. परीख पूल परिसरात या उपक्रमाचे सकाळी नऊ वाजता उद्घाटन झाले. 

यावेळी नगरसेवक संजय मोहिते, सुधर्म वझे, चेतन चव्हाण, माजी नगरसेवक रमेश पुरेकर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांच्या हातात नियम पाळण्याचे घोषणा दर्शविणारे  फलक होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 17 मेपर्यंत ही लोकप्रबोधन चळवळ सुरू राहणार आहे.