होमपेज › Kolhapur › ‘कार्टोसॅट-2’ने घेतले पहिले छायाचित्र

‘कार्टोसॅट-2’ने घेतले पहिले छायाचित्र

Published On: Jan 19 2018 1:51AM | Last Updated: Jan 19 2018 1:06AMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

आपल्या कर्तृत्वाच्या ध्वजपताका नभमंडळात रोवीत संपूर्ण जगाला ‘गगन ठेंगणे’ची अनुभूती देणार्‍या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) नववर्षामध्ये अवकाशात सोडलेल्या ‘कार्टोसॅट-2’ या श्रृंखलेतील उपग्रहाने आपले काम चोख बजाविण्यास सुरुवात केली आहे. या उपग्रहाने सोमवारी पृथ्वीचा अचूक वेध घेत पहिले छायाचित्र नोंद केले. मध्य प्रदेशातील ऐतिहासिक इंदौर शहराचे हे उपग्रहाद्वारे घेतलेले छायाचित्र ‘इस्रो’ने प्रकाशित केले असून, या छायाचित्रात मध्यभागी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रसिद्ध असलेले इंदौरचे होळकर स्टेडियम दिसते आहे.

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा या ‘इस्रो’च्या प्रक्षेपक भूमीवरून 12 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता ‘पीएसएलव्ही सी-40’ असे नामकरण असलेल्या उपग्रह प्रक्षेपक वाहनाद्वारे कार्टोसॅट-2 या श्रृंखलेतील सातव्या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. ‘इस्रो’च्या इतिहासातील ही 100 वी मोहीम होती. या मोहिमेत प्रक्षेपक वाहनासोबत 31 छोटे उपग्रह अवकाशात पाठविण्यात आले. यामध्ये 28 अन्य देशांच्या तर ‘मायक्रोसॅट’ व ‘नॅनोसॅट’ या प्रकारातील दोन भारतीय उपग्रहांचा समावेश होतो. 

‘इस्रो’च्या या मोहिमेतील नव्या उपग्रहाकडे त्याच्या अचूक निरीक्षण क्षमतेमुळे ‘अवकाशातील नेत्र’ म्हणून पाहिले जाते आहे. या उपग्रहांनी आपल्या कक्षेमध्ये स्थिरावताच आपल्या प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली. रिमोट सेन्सिंग पद्धतीने पृथ्वीवरून हाताळण्यात येणार्‍या या उपग्रहाने पाठविलेल्या पहिल्या अचूक छायाचित्राने ‘इस्रो’च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

‘पीएसएलव्ही सी-40’ हा उपग्रह वाहून नेणार्‍या प्रक्षेपक वाहनाला जोडण्यात आलेल्या उपग्रहांना जगातील अत्याधुनिक कॅमेर्‍यांची जोड देण्यात आली आहे. पॅनक्रोेमॅटिक या श्रेणीतील या कॅमेर्‍यामुळे पृथ्वीवरील विशिष्ट जागेची कृष्णधवल छायाचित्रे (ब्लॅक अँड व्हाईट) घेण्याची व्यवस्था आहे. हे कॅमेरे 9.6 किलोमीटर इतक्या अंतरावरील वस्तूंचे अचूक छायाचित्रण करू शकतात आणि त्याचे रिझोल्युशन (अवकाशविषयक स्पष्टता) 1 मीटरपेक्षा कमी आहे.