Fri, Mar 22, 2019 08:16होमपेज › Kolhapur › पहिलेच सहकार रुग्णालय सुरू होण्यापूर्वीच बंद

पहिलेच सहकार रुग्णालय सुरू होण्यापूर्वीच बंद

Published On: Aug 14 2018 1:10AM | Last Updated: Aug 14 2018 12:16AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

ग्रामीण भागातील लोकांना कमी दरात चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात म्हणून सुरू होत असलेले सहकार तत्त्वावरील पहिलेच रुग्णालय सुरू होण्यापूर्वीच बंद करण्याची वेळ मुख्य प्रवर्तकांवर आली. राजकीय कुरघोडीमुळे प्रवर्तक मंडळानेच हा निर्णय घेतला. या हॉस्पिटलसाठी गोळा केलेल्या ठेवी परत देण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली. 

राज्य शासनाने सहकार तत्त्वावर हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्यात पहिले सहकार रुग्णालय सुरू झाले. हाच प्रयोग कोल्हापूर जिल्ह्यात सुरू करण्यात आला होता. जिजामाता को-ऑप. सहकारी हॉस्पिटल नावाने हे रुग्णालय उभे राहणार होते. त्यासाठी डॉ. भीष्म सूर्यवंशी यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नांतून वैद्यकीय क्षेत्रातील 13 जणांचे प्रवर्तक मंडळ स्थापन झाले. संस्थेचे 55 अ वर्ग, तर 750 ब वर्ग सभासदही झाले. याशिवाय या हॉस्पिटलसाठी ठेवीही चांगल्या गोळा झाल्या होत्या. 

सभासदांकडून भाग भांडवलापोटी 26 लाख, तर ठेवीच्या स्वरूपात 19 लाख रुपये जमा झाले होते. त्यातून तुरंबे (ता. राधानगरी) येथे हॉस्पिटलसाठी एक तयार इमारतच घेण्यात आली. त्यात प्राथमिक सुविधा उभारणीचे काम सुरू होते. फेब्रुवारी महिन्यात हे हॉस्पिटल सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू होते; पण सात महिन्यांनंतर या कामाला गती आली नाही. यामागे जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करून हे हॉस्पिटल होणार नाही, यासाठी प्रयत्न केल्याची चर्चा आहे. 

वारंवार पाठपुरावा करूनही सहकार्य मिळत नसल्याने प्रवर्तक मंडळाने अखेर हे हॉस्पिटल सुरूच न करण्याचा निर्णय घेतला. या हॉस्पिटलसाठीगोळा केलेल्या ठेवीही परत देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत भागभांडवल व ठेवीच्या स्वरूपात गोळा झालेल्या एकूण रकमपैकी 26 लाख रुपये परतही केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सहकार हॉस्पिटल होणार नाही, हे जवळपास स्पष्ट झाले.