होमपेज › Kolhapur › राज्यातील पहिले जलविद्युत केंद्र बंदच!

राज्यातील पहिले जलविद्युत केंद्र बंदच!

Published On: Jun 18 2018 1:16AM | Last Updated: Jun 18 2018 12:10AMकौलव : राजेंद्र दा. पाटील

 महाराष्ट्रातील पहिले व देशातील दुसरे जलविद्युत केंद्र असलेले राधानगरी येथील जलविद्युत निर्मिती केंद्र बंदच असल्याने इतिहास जमा होणार हे निश्‍चित झाले आहे. ऊर्जा व पाटबंधारे मंत्र्यांनी केंद्राबाबत दिलेले आश्‍वासन हवेत विरले आहे.

1896-97 साली पडलेल्या दुष्काळापासून धडा घेऊन राजर्षी शाहू राजांनी कोल्हापूर संस्थानचे स्वतंत्र सिंचन धोरण आखले होते. त्याअंतर्गत 1908-09 साली राधानगरी धरणाची पायाभरणी केली होती. निधीची कमतरता, शाहू महाराजांचे निधन व दोन जागतिक महायुद्धे यामुळे रखडलेल्या या धरणात1949 साली प्रथम पाणीसाठा करण्यात आला, तर 1952 साली राज्यातील पहिले व देशातील दुसरे जलविद्युत निर्मिती केंद्र येथे कार्यान्वित करण्यात आले. धरणाच्या पाण्यावर जलविद्युत निर्मिती केंद्र उभारण्याची मूळ संकल्पना शाहू महाराजांची होती.

याठिकाणी ब्रिटिश बनावटीची 1.2 क्षमतेची चार जनित्रे 4.8 मेगावॅट क्षमतेने वीजनिर्मिती करत होती. या केंद्राची क्षमता साठ लाख युनिटची असताना दरवर्षी या केंद्रातून सुमारे सव्वा कोटी युनिट वीजनिर्मिती होत होती. राधानगरी धरणाची पाणीसाठवण क्षमता8.36 टी.एम.सी.एवढी आहे. मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी सरासरी पाच ते सहा हजार मिलीमीटर्स पाऊस पडतो. त्यामुळे धरणात दरवर्षी सुमारे 22 ते 25 टी.एम.सी. पाणी जमा होऊन विसर्ग होतो.  पावसाळ्यात धरणातून विसर्ग होणारे पाणी व उन्हाळ्यात सिंचनासाठी सोडले जाणारे पाणी यावर वीजनिर्मिती करण्याचा मूळ उद्देश होता.

हे केंद्र राज्यातील कार्यक्षम केंद्र म्हणून ओळखले जात होते. 1973 साली झालेल्या बिघाडानंतर 1998 साली चारही जनित्रे दुरुस्त केली होती. मात्र, सन 2003 नंतर या केंद्राला ग्रहण लागले. या केंद्रातील बंद पडलेल्या जनित्राच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले. 2005च्या दरम्यान राज्य शासनाने खासगी जलविद्युत केंद्रांना प्राधान्य दिल्याने या केंद्राशेजारीच नव्याने खासगी जलविद्युत केंद्र उभारले आहे.  देऊन शिल्लक राहणारे पाणी या केंद्राला दिले जाऊ लागले. त्यामुळे वीज केंद्रातून वीजनिर्मिती घट होऊन जमा-खर्चाचा ताळमेळ बिघडला. 
2011 मध्ये हे केंद्रच बंद करण्याचा आदेश काढला होता. राज्यात वीज वितरण कंपनीच्या कार्यकक्षेत हे एकमेव केंद्र आहे.जलविद्युत विभागाच्या मुख्य अभियंत्याच्या शिफारशीनुसार या केंद्राचे अस्तित्व संपुष्टात आणण्याच्या ठरावाला कंपनीने एप्रिल2017 मध्ये मंजुरी दिली होती व नोव्हेंबरमध्ये अतिरिक्‍त कार्यकारी अभियंता वगळता सर्व पदे रद्द करून उर्वरित कर्मचार्‍यांना अन्यत्र वर्ग केले आहे. तेव्हापासून येथे केवळ एकच अधिकारी आहे.

गतवर्षी हे केंद्र बंद करण्याच्या निर्णयाला शाहूप्रेमी जनतेतून तीव्र विरोध झाला होता.तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी हे केंद्र चालू ठेवावे म्हणून ग्रामसभांचे ठरावही केले होते. 

आमदार प्रकाश आबिटकर व पॉवर हाऊस बचाव समितीने ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे व पाटबंधारे राज्यमंत्री विजय शिवतारे यांना केंद्र वाचवण्याचे साकडे घातले होते. त्यांनी हे केंद्र सुरू ठेवण्याचे दिलेले आश्‍वासन हवेतच विरले आहे.

अतिरिक्‍त पाण्याचा धोका?

धरणाची क्षमता 8.36 टी.एम.सी. असली तरी पावसाळ्यात धरणक्षेत्रात सुमारे 22 ते 24 टी.एम.सी. पाणी जमा होते. त्यापैकी जलविद्युत केंद्राकडून जाणारे पाणी थांबल्यास धरणाला धोका निर्माण व्हायची भीती व्यक्‍त होत आहे.