होमपेज › Kolhapur › ‘आधी अ‍ॅम्ब्युलन्सला रस्ता द्या’ मोहिमेसाठी शहरवासीय एकवटले

‘आधी अ‍ॅम्ब्युलन्सला रस्ता द्या’ मोहिमेसाठी शहरवासीय एकवटले

Published On: May 13 2018 2:15AM | Last Updated: May 13 2018 1:25AMकोल्हापूर : प्रतिनिधी

‘अ‍ॅम्ब्युलन्सला रस्ता द्या’ असे आवाहन करत शहरातील विविध संस्था व संघटनांनी शनिवारी ताराराणी पुतळा चौकासह विविध ठिकाणी वाहनधारकांची जनजागृती केली. गुरुवारपासून विविध संघटनांनी या मोहिमेची सुरुवात केली.  आज या मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. यासह पोलिस प्रशासनही या मोहिमेत सहभागी झाले. यावेळी वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ घेतली. 

सकाळी नऊ वाजता ताराराणी पुतळा चौकात झालेल्या या जनजागृती उपक्रमाच्या दुसर्‍या टप्प्याचे  उद्घाटन महापौर स्वाती यवलुजे, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर वाहतूक नियंत्रक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ आदी मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी स्वयंसेवकांनी वाहनधारकांना थांबवून त्यांना अ‍ॅम्ब्युलन्सला रस्ता द्या आणि जीव वाचवा असे आवाहन केले. अनेक वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळण्याची यावेळी शपथ घेतली. तर अ‍ॅम्ब्युलन्सला रस्ता द्या याबाबतची शास्त्रीय  माहिती दर्शविणारी पत्रके यावेळी नागरिीकांना वाटप करण्यात आली.

आजपासून या मोहिमेत पोलिस प्रशासनानेही सहभाग घेतला. शहरातील परिख पूल, शाहूपुरी, दाभोळकर कॉर्नर, महापालिका चौक, सीपीआर चौक  आदींसह अनेक चौकात हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात बच्चनवेडे कोल्हापुरी, दोस्ताना, क्रिकेटवेडे कोल्हापुरी,  वांड ग्रुप, पॉवर ऑफ युथ ऑर्गनायझेशन,  विवेकानंद ओल्ड स्टूंडटस ग्रुप आदींनी पुढाकार घेतला. कोडोली येथील गनिमी कावा ग्रुपने आकर्षक पद्धतीने तयार केलेली जनजागृती पत्रके वाहनधारकांना दिली. यामध्ये नगरसेवक संजय मोहिते, सुधर्म वाझे, अभय देशपांडे, बिपीन मिरजकर, प्राचार्य किरण पाटील, सागर बगाडे,  रमेश हजारे, राहुल देसाई, अमोल कुलकर्णी, प्रकाश वर्गीस आदींसह मान्यवरांनीही सक्रिय सहभाग घेतला. ही मोहीम 17 मेपर्यंत सुरू राहणार आहे.