Thu, Aug 22, 2019 10:13होमपेज › Kolhapur › जंगलातील वणवा रोखण्यासाठी ‘फायर वॉचर’पथके

जंगलातील वणवा रोखण्यासाठी ‘फायर वॉचर’पथके

Published On: Dec 21 2017 1:53AM | Last Updated: Dec 20 2017 11:00PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

जंगलाला लागणारा वणवा रोखण्यासाठी वन विभागाने आता ‘फायर वॉचर’ पथके तैनात केली आहे. या पथकांमुळे जंगलात लागणार्‍या वणव्यावर किमान 70 टक्के नियंत्रण मिळवता येईल, असे वन विभागाचे म्हणणे आहे. जंगलावर लक्ष ठेवण्यासाठी ‘वॉच टॉवर’ म्हणून जिल्ह्यातील किल्लांचाही वापर केला जाणार आहे.

दरवर्षी जानेवारी ते मार्च या महिन्यात जंगलांना आग लागण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असतात. जंगलक्षेत्राला लागून असलेल्या खासगी जमीन आणि जंगल परिसर अथवा शेजारून होणारी वाहतूक या दोन गोष्टी या आगींना प्रामुख्याने कारणीभूत ठरत आहेत. आता याच गोष्टींवर वन विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे. जंगलक्षेत्रालगत असलेल्या खासगी जमिनीत लावलेल्या आगीमुळे जंगल क्षेत्रात आग पसरली तर संबंधित शेतकर्‍यांवर गुन्हा दाखल करण्याबाबतच्या नोटिसा ग्रामपंचायतींना पाठवण्यात आल्या आहेत. खासगी जागेतील बांध, कचरा जाळायचा असेल तर संबंधित वनविभागाच्या कर्मचार्‍यांना त्याची माहिती द्यावी, आग लावल्यानंतर ती पूर्ण विझेपर्यंत शेतात थांबून राहा, अशा सूचनाही या नोटिसाद्वारे वनक्षेत्रानजीक खासगी जमिनी असलेल्या शेतकर्‍यांना देण्यात आल्या आहेत.

जंगलातील वणवा रोखण्यासाठी पाच ते सहा कर्मचार्‍यांचे ‘फायर वॉचर’ पथक स्थापन केले जाणार आहे. ही पथके नेमून दिलेल्या क्षेत्रात तीन शिफ्टमध्ये गस्त घालणार आहेत. या पथकांकडे आपत्तकालीन साहित्यही पुरवण्यात येणार आहे. यामुळे लागलेली आग वेळीच आटोक्यात आणणे शक्य होणार आहे. यासह वनमजुरांच्या मदतीनेही अधिकार्‍यांची पाहणी पथके कार्यरत राहणार आहेत. विभाग आणि क्षेत्र निहाय 24 तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्षही स्थापन केला जाणार आहे. या सर्वांच्या समन्वयातून वणव्यावर नियंत्रण मिळवण्याचे वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

‘फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया’ कडून जंगलांना लागलेल्या आगींची माहिती दिली जाते. सॅटेलाईटच्या माध्यमातून मिळालेली ही माहिती संबंधितांना कळवण्यात येते. मात्र, ही माहिती मिळून, त्यावरील उपाययोजना करेपर्यंत अनेकदा वेळ लागण्याचीही शक्यता आहे. यामुळे जंगल परिसरातील किल्ल्यांचाही ‘वॉच टॉवर’ म्हणून वापर करण्याचा विचार आहे. किल्ल्यांवर तीन शिफ्टमध्ये कर्मचारी तैनात केले जातील.

त्यांना अत्याधुनिक दुर्बीण आणि संपर्कांची साधने उपलब्ध करून दिली जातील. किल्लावरून हे कर्मचारी परिसरातील जंगलावर लक्ष ठेवतील. वणवा लागला तर त्याची तत्काळ माहिती संबंधित कार्यालयात दिली जाईल. ज्या किल्ल्यांवर संपर्काला अडचणी येतात, असे किल्ले वगळता जिल्ह्यातील बहुतांशी किल्लांवर कर्मचारी तैनात करणे शक्य आहे, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.