Tue, Apr 23, 2019 01:35होमपेज › Kolhapur › गैरहजर कर्मचार्‍यांची सेवा समाप्‍ती करा

गैरहजर कर्मचार्‍यांची सेवा समाप्‍ती करा

Published On: Jul 12 2018 1:41AM | Last Updated: Jul 12 2018 12:49AMकोल्हापूर : प्रतिनिधी

वर्षापेक्षा अधिक काळापासून गायब असलेल्या कर्मचार्‍यांची सेवा समाप्‍त करावी, तसेच अनधिकृतपणे गेल्या सहा महिन्यांपासून गैरहजर कर्मचार्‍यांची गैरहजेरीच्या काळातील सेवा खंडित करण्याच्या सूचना विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत दिल्या. दरम्यान, पंचायत समितीच्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी अधिकार्‍यांकडून टाळाटाळ होत असल्याने त्यांनी अधिकार्‍यांना चांगलेच खडसावल्याचे समजते. 

आढावा बैठकीत 2016-17 मध्ये झालेल्या आयुक्‍त कार्यालयाच्या तपासणीत 189 त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यातील 32 मुद्द्यांवर चर्चा झाली.विभागप्रमुखांकडून पंचायत समितीच्या सभांना उपस्थित राहून आढावा घेण्यात करण्यात येणारी टाळाटाळ, अनधिकृत गैरहजर राहणार्‍या कर्मचार्‍यांवरील कारवाई, बिंदू नामावली, अपहार प्रकरणे, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, स्वच्छ भारत अभियान, ग्राम निधी अपहार प्रकरणे, विविध योजनांमध्ये करण्यात आलेली विकासकामे, 14 व्या वित्त आयोगातील निधी, बांधकाम विभागाकडील प्रलंबित कामे, शालेय पोषण आहार, खासगी शिक्षण संस्था रोस्टर तपासणी आदी विषयांचा  आढावा घेण्यात आला. 

सुरुवातीलाच पंचायत समितीच्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी टाळाटाळ करणार्‍या अधिकार्‍यांना त्यांनी जाब विचारला. यापुढे पंचायत समितीच्या सभांना उपस्थित राहून त्या कामाचा आढावा घ्यावा व पंंधरा दिवसांत अहवाल पाठविण्याची सूचना दिली. अनुपस्थित राहणार्‍या कर्मचार्‍यांवरही कडक कारवाई करण्याचा, तसेच ज्या कर्मचार्‍यांची विविध आरोपांमध्ये सुरू असलेली चौकशी लवकर पूर्ण करावी, असे सांगितले. वर्षापेक्षा अधिक काळापासून गायब असलेल्या किशोर पारुडकर, सुरेश कुंभार, अर्चना नरळे व सतीश गव्हाणे या कर्मचार्‍यांना सेवेतून काढण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली. निर्मल ग्राम योजनेत शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांनी आपल्या कामाची गती वाढवावी.

त्याचा पंधरा दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ग्राम निधीत झालेल्या अपहाराची रक्‍कम तातडीने वसूल करण्याची कार्यवाही करावी, विविध योजनेतील अपूर्ण असणारी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. समाजकल्याण विभागाच्या वतीने दलित वस्ती योजनेतील विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी या विभागाच्या कामाबाबत समाधान व्यक्‍त केल्याचे समजते. शिक्षण व आरोग्य विभागातील काही वर्कशिट डॉ. म्हैसेकर यांनी तपासल्या. त्यांना यात गांभीर दोष आढळल्याने त्यांनी वेतनवाढ रोखण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. यासंदर्भात पंधरा दिवसांत तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

बैठकीस पुणे विभागीय कार्यालयातील उपायुक्‍त (विकास) चंद्रकांत गुडेवार, उपायुुक्‍त (आस्थापना) संभाजी लांगोरे, सहा. आयुक्‍त (तपासणी) सोनाली घुले व सहा. आयुक्‍त (चौकशी) रश्मी खांडेकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, राजेंद्र भालेराव, सोमनाथ रसाळ, प्रियदर्शनी मोरे, प्रकल्प संचालक (प्रभारी) सुषमा देसाई, कार्यकारी अभियंता तुषार बुरूड, एस. एस. शिंदे, तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. स्वागत डॉ. कुणाल खेमनार यांनी केले.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांना नोटीस

डॉ. म्हैसेकर यांनी कोल्हापुरात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले असल्याने त्यांना या जिल्हा परिषदेची माहिती आहे. महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी सादर केलेल्या माहितीत तफावत आढळून आली. ते माहितीही व्यवस्थित देऊ न शकल्याने त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून खुलासा मागवून घ्यावा, अशा सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.

तांब्या व फूलपात्रमधून पाणी

प्लास्टिकबंदीच्या निर्णयाचे पडसाद आजच्या आढावा बैठकीत दिसून आले. एरव्ही मंचावर पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या दिसायच्या. आजच्या बैठकीत मात्र सर्वांसमोर स्टीलचा तांब्या आणि फूलपात्र ठेवण्यात आले होते. यासाठी दोन डझन तांबे व दोन डझन फूलपात्र खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.