Tue, Apr 23, 2019 09:37होमपेज › Kolhapur › देखभाल दुरुस्ती दरसूची ठरविण्यास मुहूर्त सापडला

देखभाल दुरुस्ती दरसूची ठरविण्यास मुहूर्त सापडला

Published On: May 28 2018 1:42AM | Last Updated: May 27 2018 11:09PMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

आपत्ती व्यवस्थापनाच्या कामामध्ये सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या वीज मंडळातील देखभाल दुरुस्तीच्या कामांच्या नव्या दरसूचीला मुहूर्त सापडला आहे. दै. ‘पुढारी’ने एका विशेष वृत्ताद्वारे दिलेल्या दणक्यानंतर वीज मंडळ प्रशासनाला जाग आली असून अवघ्या दोन दिवसांमध्ये मंडळाच्या अधिकार्‍यांनी देखभाल दुरुस्तीची नवी दरसूची जाहीर केली. यामुळे आता देखभाल दुरुस्तीच्या कामातील अडथळा दूर झाला आहे. साहजिकच चालू वर्षी पावसाळ्यात येणार्‍या आपत्तीला तोंड देताना मंडळाला ठेकेदारांची उणीव भासणार नाही. शिवाय सर्वसामान्य नागरिकांचे विजेअभावी होणारे हालही कमी होण्यास मदत होणार आहे.

कोल्हापूर शहरात साकोली कॉर्नर येथे वादळी वार्‍यात विद्युत खांबावर झाड कोसळून झालेल्या खंडित वीजपुरवठ्याच्या पार्श्‍वभूमीवर दै. पुढारीने विशेष वृत्तांची एक मालिका प्रसिद्ध केली होती. या मालिकेत दि. 14 मे रोजी प्रसिद्ध झालेल्या विशेष वृत्तात वीज मंडळातील अनास्थेकडे लक्ष वेधण्यात आले होते. मंडळात देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आवश्यक दरसूचीमध्ये गेली आठ वर्षे बदल न केल्यामुळे जुन्या दराने काम करण्यास ठेकेदार मिळत नाहीत आणि यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खंडित वीजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागतो. शिवाय मंडळाने सिमेंटच्या खांबाची निविदाही निश्‍चित न केल्यामुळे मंडळाकडे खांबही उपलब्ध नाहीत याबाबी या वृत्तामध्ये निदर्शनास आणून देण्यात आल्या होत्या. यानंतर वीज मंडळात कारवाईची चक्रे गतिमान झाली. 

नैसर्गिक आपत्तीवेळी सर्वप्रथम विजेच्या पायाभूत रचनेला मोठा धक्का बसतो. विजेचे खांब उन्मळून पडतात. वृक्षांच्या फांद्या विजेच्या तारांवर पडल्यामुळे तारा तुटतात. काही ठिकाणी ट्रान्स्फॉर्मर जळण्याचे प्रकारही घडतात. या प्रकारामध्ये देखभाल दुरुस्तीच्या सक्षम यंत्रणेची गरज असते. निसर्गाच्या आकांत तांडवात कोलमडून पडलेली वीज वहनाची यंत्रणा पूर्ववत सुरू करण्याचे आव्हान या यंत्रणेपुढे असते. मंडळामध्ये यासाठी कामाची दरसूची (शेड्यूल्ड रेटस्) निश्‍चित करण्याची प्रथा आहे. हे दर समाधानकारक असतील तर ठेकेदार काम करण्यास राजी होतात. परंतु, वीज मंडळाने सन 2011-12 पासून या दरसूचीकडे लक्षच दिले नव्हते. महागाई वाढल्याने जुन्या दरसूचीप्रमाणे दर परवडत नसल्याने ठेकेदारांनी मंडळाकडे पाठ फिरविली होती. स्वभाविकतः त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत होता. आता सात वर्षांनंतर वीज मंडळाने ही दरसूची बदलण्याचे कष्ट घेतले आहेत.

खांबांची निविदा एका रात्री निश्‍चित

सिमेंटच्या खांबांची निविदा एका रात्रीत निश्‍चित करण्यात आली आणि सर्वात आश्‍चर्याची बाब म्हणजे बैठकांचे सत्र राबवित अवघ्या आठवड्यात मंडळाने नवी दरसूचीही निश्‍चित केली. या दरसूचीने आता ठेकेदार वर्गातही समाधान व्यक्‍त करण्यात आले असून चांगले दर मिळाल्यामुळे देखभाल दुरुस्तीची कामेही वेगाने पूर्ण होतील, असा विश्‍वास व्यक्‍त करण्यात येतो आहे.