Tue, Jul 16, 2019 11:40होमपेज › Kolhapur › नाल्यांसाठी मिळेनात ठेकेदार

नाल्यांसाठी मिळेनात ठेकेदार

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 24 2018 12:51AMकोल्हापूर : सतीश सरीकर  

कोल्हापूर शहरातील नाल्यांतून मोठ्या प्रमाणात मैलामिश्रित सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळते. त्यामुळे पंचगंगेला प्रदूषणाचा विळखा पडत आहे. परिणामी, प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी नाल्यातच अडवून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी तब्बल 8 कोटींचा निधी मंजूर आहे. महापालिका प्रशासनाने त्यासाठी तीनवेळा निविदा (टेंडर) काढल्या. परंतु, ठेकेदार मिळत नसल्याने निधी पडून आहे. नाल्यांच्या कामासाठी ठेकेदार मिळेनात, अशी अवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, ठेकेदारांच्या सूचनेनुसारच निविदेत बदल करण्यात आला होता.

शहरातील ड्रेनेज कामासाठी अमृत योजनेंतर्गत 70 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. जुलै 2017 मध्ये हा निधी मंजूर झाला. परंतु, नाल्यांचे काम किचकट असल्याने ठेकेदारांनी निविदाच भरल्या नाहीत. परिणामी, महापालिका प्रशासनाला नाल्यांचे काम वगळून 59 कोटींच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवावी लागली. त्याला ठेकेदाराने प्रतिसाद दिला. त्यानुसार शहरात 112 कि.मी. लांबीची ड्रेनेजलाईन टाकणे, दुधाळी येथे 6 एम.एल.डी. व लाईन बाजार येथे 4 एम.एल.डी. सांडपाणी प्रक्रिया केंद्र बांधणे आदीसह इतर कामांचा समावेश आहे. 

शहरातून बारा नाले वाहतात. त्यापैकी जयंती नाला, दुधाळी नाला येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्रे आहेत. दुधाळी नाल्याकडे लक्षतीर्थ नाला वळविण्यात येणार आहे. बापट कँप व लाईन बाजार येथे पंपिंग स्टेशन बांधले असून, ते नोव्हेंबरपर्यंत कार्यान्वित होईल. परंतु, इतर सात नाल्यांचा प्रश्‍न गंभीर आहे. त्या सात नाल्यांतील सांडपाण्यावर फायटोरीड तंत्रज्ञानावर आधारित प्रक्रिया करून ते सोडावे, अशी सूचना निरी संस्थेने दिली होती. परंतु, गरजेचे असलेले हे काम क्‍लिष्ट असल्याचे कारण पुढे करून कोणत्याही ठेकेदाराने त्याला प्रतिसाद दिला नाही. एकाही ठेकेदाराने निविदा भरली नाही. त्याऐवजी नाले अडवणे व वळवून सांडपाणी लाईन बाजार व दुधाळी येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राला जोडावे, अशी सूचनाही काहींनी केली. त्यानुसार नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, त्यासाठीही कोणत्याच ठेकेदाराने निविदा भरलेली नाही. त्यामुळे नाले अडवून त्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम रखडले आहे. 

निधी असूनही कामे पेंडिंग

फुलेवाडी नाला, जुना बुधवार पेठ नाला, सीपीआर नाला, राजहंस प्रेस नाला, रमणमळा नाला, ड्रीमवर्ल्ड नाला, मार्केट यार्ड नाला या सात नाल्यांचा त्यात समावेश आहे. या नाल्यांतून रोज पंचगंगेत सुमारे 80 लाख लिटर्स मैलामिश्रित सांडपाणी मिसळत आहे. निधी असूनही काम झाले नसल्याने नदीच्या प्रदूषणात भर पडत आहे.