होमपेज › Kolhapur › ‘गांजा’च्या  पुडीचा ग्रामीण भागाला विळखा

‘गांजा’च्या  पुडीचा ग्रामीण भागाला विळखा

Published On: Apr 22 2018 1:16AM | Last Updated: Apr 21 2018 11:13PMकोल्हापूर : विजय पाटील 

एक कॉल केला की तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला गांजाची पुडी आणून दिली जाते. लहान पुडी दहा रुपये आणि मोठी वीस रुपये असा थेट दरच आहे. या गांजाच्या नशेचा विळखा ग्रामीण भागात घट्ट होत आहे. तसेच शाळकरी मुलांचे गांजा ओढण्याचे प्रमाणही धोकादायकरीत्या वाढू लागले आहे. अल्पवयीन मुले व्यसनाधीन होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. हे लोण कॉलेजच्या कॅम्पसपासून आता शाळांच्या चिरेबंदी समजल्या जाणार्‍या भीतींपर्यंत पोहोचले आहे. गांजाचे व्यसन करणार्‍या मुलांचे प्रमाण सर्रास आहे असे नाही. मात्र, अलीकडे ही संख्या मात्र वेगाने वाढत आहे. गांजा सहज उपलब्ध होतो तसेच तो तुलनेने स्वस्त असल्याने  यामध्ये मुले गुंतत चालली आहे. गांजाच्या व्यसनाचे गंभीर परिणाम माहीत असूनही याच्या दुष्परिणामांबाबत मात्र म्हणावी तशी चर्चा होत नाही. गांजा हे धोकादायक व्यसन आहे या द‍ृष्टिकोनातून जागृतीही होताना दिसत नाही. 

सध्या विविध गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचे प्रमाण वाढू लागले आहे. या गुन्ह्यांचा खोलवर अभ्यास केला तर यामध्ये गांजाचे व्यसन करणार्‍या मुलांचा जास्त सहभाग असल्याचे दिसून येईल. कारण गांजा ही सुंदपणा आणणारी नशा असल्याने आपण काय करतोय, याचे भान नशेबाजांना नसते. त्यातून हिंसक प्रकार सहज घडतात. गांजा कुठे तयार होतो, त्याची विक्री कशी होते हे पोलिसांना माहीत नाही, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. गांजाबाबत कठोर कारवाई केली तरच दम मारो दम म्हणत आयुष्याला खेळ समजणारी तरुणाई किमान वळणावर येऊ शकेल, अशी सकारात्मक अपेक्षा करायला हरकत नाही. 

Tags : Kolhapur, out, rural, areas, Ganja Drug