Tue, Apr 23, 2019 00:39होमपेज › Kolhapur › ‘जलयुक्‍त’ची कामे करणार्‍या गावांना आर्थिक मदत

‘जलयुक्‍त’ची कामे करणार्‍या गावांना आर्थिक मदत

Published On: Apr 28 2018 1:42AM | Last Updated: Apr 28 2018 1:00AMकोल्हापूर : प्रतिनिधी

ज्या गावात सामूहिकपणे ‘जलयुक्‍त’ची कामे केली जातील, अशा गावांना आर्थिक मदत दिली जाईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीटंचाई बाबत बैठक झाली. यावेळी जिल्ह्यात पुरेसा पाणीसाठा असल्याचा निर्वाळा देत टंचाई जाणवल्यास तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

पालकमंत्री म्हणाले, गेल्यावर्षी जिल्ह्यात पाण्याची टंचाई होती. यावर्षी तशी परिस्थिती नाही. यामुळे पाण्याचे आरक्षण करण्याची गरज नाही. जिल्ह्यात चिकोत्रा आणि चित्री प्रकल्प वगळता सर्व धरणसाठ्यांत पुरेसा पाणीसाठा आहे. यामुळे पिण्यासाठी आणि शेतीसाठी योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. ज्या गावांचा जलयुक्‍त शिवार योजनेत समावेश झाला नाही अशा गावांनी जर लोकवर्गणीतून जलयुक्‍तची कामे सुरू केली तर त्यांना आर्थिक सहाय्य केेले जाईल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

चिकोत्रा, चित्री प्रकल्पात कमी पाणीसाठा आहे. 22  मेपासून उपसाबंदी केली आहे. पिण्यासाठी पाणी राखीव ठेवून शेतीसाठी दोन आवर्तन देता येतील याबाबत नियोजन केले जात आहे. पहिले आवर्तन दिल्यानंतर पिण्यासाठी शिल्लक पाण्याची स्थिती बघून दुसर्‍या आवर्तनाबाबतचा निर्णय घेतला जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यात टंचाईच्या उपाययोजना म्हणून 339 कामे केली जाणार आहेत. 2 कोटी 31 लाख रुपयांच्या या कामांना प्रत्यक्षात मे महिन्यात प्रारंभ होणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. यावेळी विविध विभागांच्या वतीने टंचाई निवारणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात आले. माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार उल्हास पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर आदींनी आपल्या मतदारसंघातील पाणीटंचाईची माहिती देत त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली. चिकोत्रा, चित्री प्रकल्पात पाणीसाठा चांगला नाही, यामुळे या लाभ क्षेत्राचा अधिकार्‍यांनी दौरा करावा, अशी मागणी आ. मुश्रीफ यांनी केली. त्यावर या भागाचा दौरा करण्याची सूचना पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना केली.

बैठक टंचाईची आहे

प्रारंभीच आ. मुश्रीफ यांनी भरपूर पाऊस असूनही अपूर्ण प्रकल्पांमुळे टंचाई निर्माण होत असल्याचे सांगत हे प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी केली. यावर पाटील यांनी ही बैठक टंचाईची आहे, असे सांगत मुद्द्याला बगल दिली.

प्रकल्पग्रस्तांना तिप्पट भरपाई

प्रकल्पग्रस्तांचे पुनवर्सन करताना घरांच्या बदल्यात गावठाण, जमिनीच्या बदल्यात लाभ क्षेत्रात जमिनी दिल्या जातात. आता प्रकल्पग्रस्तांना भरपाई म्हणून लाभ क्षेत्रातील जमिनींच्या भावांची सरासरी काढून, त्याच्या तिप्पट रक्‍कम देण्यात येत आहे. उचंगी प्रकल्पग्रस्तांबाबत असा प्रस्ताव तयार केला असल्याचे सांगत मोठ्या प्रमाणात भरपाई मिळणार असल्याने शेतकर्‍यांचे समाधान होत आहे. यामुळे त्यांचा विरोध राहणार नाही, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. धामणी प्रकल्पाबाबत कंत्राटदार न्यायालयात गेला आहे. या प्रकल्पासाठीही नव्याने तरतूद केली असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

तुमच्या जीभेवर डाग आहे का!

बैठकीनंतरही आ. कुपेकर व आ. मुश्रीफ यांनी मतदारसंघातील प्रल्पाबाबत पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यावर कुपेकर वहिनी आणि त्यांच्या मुलीचे काम चांगले सुरू आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कामाची मोठी यादी आहे, असे पाटील यांनी सांगितले. यावेळी आ. मुश्रीफ उठून जात असताना पाटील यांनी वहिनी आता आमच्याकडे आल्या आहेत, असे सांगितले. त्यावर मुश्रीफ म्हणाले, त्यांना आम्ही सांगितले आहे. तिकडे गेला की तुम्ही पडणारच म्हणून, त्यावर तुमच्या जीभेवर काही डाग वैगेरे आहे का, असा मुश्रीफ यांना पाटील यांनी सवाल करताच उपस्थित सर्वांनाच हूस आवरता आले नाही.