Sun, Jul 21, 2019 01:39होमपेज › Kolhapur › पादचारी पुलाचा मार्ग मोकळा

पादचारी पुलाचा मार्ग मोकळा

Published On: Aug 21 2018 1:36AM | Last Updated: Aug 20 2018 11:51PMकोल्हापूर : प्रतिनिधी

नगरोत्थान योजनेच्या पहिल्या टप्प्यातील निधीचा दोन महिन्यांपूर्वी काढलेला धनादेश महापालिकेला प्राप्त झाला आहे. यामुळे रेल्वे फाटकावर उभारण्यात येणार्‍या पादचारी उड्डाण पुलाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या कामाची निविदा काढून, प्रत्यक्ष कामाची सुरुवात कधी होणार, याबाबत प्रश्‍नचिन्हच असल्याने नागरिकांना आणखी काही महिने धोकादायक पद्धतीनेच ये-जा करावी लागणार आहे.

रेल्वे फाटकावर मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरी या मार्गावर ये-जा करणार्‍या नागरिकांसाठी पादचारी पूल उभारण्याबाबत रेल्वेने महापालिकेला सूचना केली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात काही दिवस हे फाटक बंद केल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. त्यावेळी जिल्हा नियोजन समितीतून या पुलासाठी महापालिकेला निधी देण्याचा निर्णय झाला होता.त्यानुसार मार्च महिन्यात नगरोत्थान योजनेद्वारे 3 कोटी 74 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

या निधीतून 80 लाख रुपयांचा निधी या पादचारी पुलासाठी वापरण्यात येणार आहे. हा निधी महापालिकेला वेळेत मिळावा याकरिता नगरपालिका प्रशासनाने 1 कोटी 23 लाख 52 हजार 292 रुपयांचा पहिला हफ्ता देण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्याकरिता यापूर्वी दिलेल्या निधीच्या खर्चाचे ‘उपयोगिता प्रमाणपत्र’ दाखल करण्याबाबत महापालिकेला सूचना करण्यात आली. हे प्रमाणपत्र दिल्यानंतरच हा निधी देण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याने, नगरोत्थानच्या पहिल्या टप्प्यातील निधीचे वितरण थांबविण्यात आले होते. दरम्यान, नगरपालिका प्रशासनाने पहिल्या टप्प्यातील 1 कोटी 32 लाख 52 हजार 292 रुपयांच्या निधीचा धनादेश 12 जून रोजी काढला. मात्र, तरीही उपयोगिता प्रमाणपत्र महापालिकेने सादर केले नाही.

पादचारी पुलाचे काम रखडल्याने जिल्हा प्रशासनाने उपयोगिता प्रमाणपत्र नंतर द्या, प्रथम हा निधी घेऊन जा असे महापालिकेला कळवले. त्यानंतरही महापालिका प्रशासनाला हा धनादेश नेण्यास वेळ मिळाला नाही, अखेर गुरुवार दि. 16 रोजी हा धनादेश महापालिकेने नेल्याचे नगरपालिका प्रशासन विभागातून सांगण्यात आले. महापालिकेला मिळालेल्या या निधीतून 80 लाख रुपये पादचारी पुलासाठी खर्च केले जाणार आहेत. यामुळे पुलाच्या निविदा काढून प्रत्यक्ष काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दररोज या मार्गावरून 40-50 हजार लोकांची ये-जा सुरू असते. गेल्या दहा वर्षांत या ठिकाणी झालेल्या अपघातात 33 जणांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे शक्य तितक्या लवकर या पादचारी पुलाचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. मात्र, महापालिकेचा कारभार पाहिला तर कधी निविदा निघणार, त्याला कसा प्रतिसाद मिळणार, त्यानंतर प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार आणि कधी पूर्ण होणार हे निश्‍चित सांगणे कठीण आहे. यामुळे आणखी काही महिने तरी नागरिकांना रेल्वे फाटकावरून जीव धोक्यात घालूनच ये-जा करावी लागणार आहे.