होमपेज › Kolhapur › आघाड्यांच्या रचनेसाठी नेत्यांची दमछाक

आघाड्यांच्या रचनेसाठी नेत्यांची दमछाक

Published On: Mar 16 2018 12:45AM | Last Updated: Mar 15 2018 11:12PMआजरा : ज्योतिप्रसाद सावंत

नगरपंचायत निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्या करिता केवळ दोन दिवस राहीले असून प्रभागनिहाय इच्छुकांची संख्या दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये प्रचंड असल्याने आघाडीमध्ये नेमके कोणाला स्थान द्यावयाचे? याबाबत एकमत होऊ शकत नसल्याने या आघाड्यांचे अधिकृत उमेदवार जाहीर होण्यास विलंब होत आहे. आघाड्यांची रचना नेतमंडळीच्या द‍ृष्टीने डोकेदुखी ठरू लागली असून या निवडणुकीत शिवसेनेसह भाजपलाही बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. तर मनसे, स्वाभिमानीसह इतर पक्षांचा आघाड्यांच्या रचनेत कोठेही समावेश नसल्याचे निदर्शनास येत असल्याने या पक्षांसह छोट्या-मोठ्या गटांची या निवडणुकीत फरफट होत असल्याचे चित्र दिसत आहे.

नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम सुरू झाल्यापासून भाजप व इतर पक्षांची आघाडी व अधिकृत उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. हीच अवस्था राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. काही प्रभागातील उमेदवार दोन्ही आघाड्यांकडून निश्‍चित असले तरी अद्याप काही उर्वरित प्रभागातील पेच सुटलेले नाहीत. एकाचवेळी पक्षांतर्गत विविध गटांचे उमेदवार मागू लागल्याने उमेदवारीसंदर्भातील निर्णय घेणे अडचणीचे ठरत आहे. भाजप व मित्र पक्षांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीप्रमाणेच ताराराणी आघाडीचा फॉर्म्युला वापरून ताराराणी आघाडीच्या लेबलवर निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे. या संपूर्ण आघाडीचे नेतृत्व अर्थातच महसूलमंत्री चंद्रकांदादा पाटील, आमदार सुरेश हाळवणकर व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे राहणार आहे. भाजपमध्ये नव्या-जुन्यांचा वाद आता चर्चेत येऊ लागला आहे. तिसर्‍या आघाडीकडूनही बर्‍यापैकी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

राष्ट्रवादीने राष्ट्रीय काँग्रेस आपल्यासोबत राहणार असे गृहीत धरून समीकरणे मांडण्यास सुरुवात केली आहे. परंतु, राष्ट्रीय काँग्रेसला राष्ट्रवादी नेमक्या किती जागा देणार, हा प्रश्‍नही अनुत्तरीतच आहे. माजी आमदार के. पी. पाटील यांनी आजरा दौरा यापूर्वी केला आहे. मात्र,  निर्णय आमदार हसन मुश्रीफ यांच्या भूमिकेवर अवलंबून राहणार आहेत.  

या सर्व प्रकारात मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय यांची कोठेच चर्चा दिसत नाही. तर राष्ट्रीय समाज पक्षाने तीन ठिकाणी उमेदवारी अर्ज ठेवून आपली निवडणुकीतील भूमिका स्पष्ट केली आहे. अन्यत्रही उमेदवारी दाखल करण्याच्या हालचालीही रासपकडून सुरू आहेत. एकंदर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी दोन दिवसांवर राहिला असला तरी आघाड्यांच्या रचना स्पष्ट न झाल्याने आघाड्यांमधील सावळागोंधळ आता चर्चेत येऊ लागला आहे. एकदा आघाड्यांचे अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतर उमेदवारी न मिळालेले इच्छुक या गोंधळात आणखीन भर घालून निवडणुकीत मतदारांचे चांगलेच मनोरंजन करतील, असे दिसत आहे.