Wed, Mar 20, 2019 08:32होमपेज › Kolhapur › पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी खासदार शेट्टींवर गुन्हा दाखल करा

पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी खासदार शेट्टींवर गुन्हा दाखल करा

Published On: Jun 23 2018 1:21AM | Last Updated: Jun 23 2018 12:43AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी आला, मात्र सध्या पंचगंगेचे पाणी शेतीयोग्यसुद्धा नाही. याचे दुष्परिणाम पंचगंगा काठावरील जनतेला मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी खा. राजू शेट्टींसह जबाबदार घटकावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी पत्रकार परिषदेत केली.

केंद्र शासनाच्या नदी प्रदूषणावर नियंत्रण ठेवणार्‍या जिल्हा स्तरावरील  डीएलआरएमसी समितीचे खा. राजू शेट्टी अध्यक्ष आहेत. या समितीचेही याकडे दुर्लक्ष आहे. या प्रदूषणाला कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी नगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, डीएलआरएमसी समितीचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी जबाबदार आहेत, असा आरोप माने यांनी यावेळी 
केला. 

माने म्हणाले, ‘पंचंगगेच्या प्रदूषणात कोल्हापूर, इचलकरंजी शहरांचा 75 टक्के, ग्रामीण भागाचा 8 टक्के वाटा आहे. औद्योगिक वसाहतीमधून हजारो लिटर केमिकलयुक्त सांडपाणी नदीत मिसळते. परिणामी कॅन्सरसारख्या रोगाला शिरोळ तालुक्यातील लोक बळी पडत आहेत. यापूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेला 91 कोटी रुपये सांडपाण्यावर प्रकिया केंद्र उभारण्यासाठी मिळाले. महापालिकेने 78 एमएलडी सांडपाणी शुद्ध करून पुन्हा नदीपात्रात सोडत असल्याचा अहवाल दिला आहे. इचलकरंजी नगरपालिकेला यासाठी 22 कोटी रुपये मिळाले आहेत. अमृत योजनेतून मिळालेल्या निधीतून 70 कोटी रुपये ड्रेनेजासाठी खर्च होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनंतर पुन्हा 108 कोटी रुपयांचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे.

आतापर्यंत प्राप्त झालेला निधी योग्य रितीने खर्च झाला आहे का? याची चौकशी करावी. ग्रामीण भागातही प्रदूषण रोखण्यासठी टोटल सॉलीड वेस्ट प्लॅन देण्यात यावेत. पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी, नियंत्रणासाठी कायमस्वरूपी प्राधिकरण नेमावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा प्रदूषण रोखण्यासाठी दृष्टिकोन सकारात्मक आहे. त्यांनी हा प्रश्‍न गांभीर्याने घेतला आहे. मात्र, प्रशासनाकडून अनेकदा त्यांना चुकीची माहिती पुरवून दिशाभूल केली जात आहे, असेही माने म्हणाले.