Fri, Jul 19, 2019 22:57होमपेज › Kolhapur › शस्त्रांचे प्रदर्शन करणार्‍या संघटनांवर गुन्हे दाखल करा

शस्त्रांचे प्रदर्शन करणार्‍या संघटनांवर गुन्हे दाखल करा

Published On: Jun 06 2018 1:42AM | Last Updated: Jun 06 2018 1:16AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शस्त्रांचे प्रदर्शन करीत येथील मध्यवर्ती मार्गावरून मिरवणुका काढणार्‍या संघटनांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी डाव्या व पुरोगामी आघाडीच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे मंगळवारी केली. शांतता सुव्यवस्थेला आव्हान देणार्‍यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा न उगारल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.  निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापुरात बजरंग दलामार्फत नुकतेच शिबिर घेण्यात आले होते. शस्त्र संचलनाने त्याची सांगता करण्यात आली. विविध शस्त्रे घेऊन संचलन करण्यात आले. शस्त्रे हातात घेऊन संचलन करणे बेकायदेशीर व गुन्ह्याचे कृत्य आहे. अशा घटनांमधून सर्वसामान्यांमध्ये दहशत माजविण्याचा प्रयत्न असल्याचा संदेश मिळतो, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

राज्यकर्ते व पोलिस यंत्रणेविषयी समाजात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोळकर, ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला जबाबदार असणार्‍या संघटनांविरुध्द कारवाईची मागणी होऊनही शासन यंत्रणेकडून धर्मांध संघटनांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे, असाही आरोप करण्यात आला आहे. कॉ. सतीशचंद्र कांबळे, नामदेव गावडे, लक्ष्मण वायदंडे, अनिल चव्हाण, चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात दिलदार मुजावर, इर्शाद फरास,  प्रा. सुनिता अमृतसागर, प्रशांत आंबी, अनंत कुलकर्णी यांचा समावेश होता.   घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवरील कारवाईबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे पोलिस अधीक्षक मोहिते यांनी स्पष्ट केले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलिस उपअधीक्षक (गृह) सतीश माने आदी उपस्थित होते.