Tue, Jul 16, 2019 12:07होमपेज › Kolhapur › वादग्रस्त अधिकार्‍यांची ‘पोस्टिंग’साठी फिल्डिंग

वादग्रस्त अधिकार्‍यांची ‘पोस्टिंग’साठी फिल्डिंग

Published On: Jun 07 2018 2:05AM | Last Updated: Jun 07 2018 1:14AMकोल्हापूर : सतीश सरीकर 

पोलिस दलातील काही अधिकार्‍यांच्या नुकत्याच कोल्हापूर परिक्षेत्रात विनंती बदल्या झाल्या. विनंतीचा फायदा उठवत काही अधिकार्‍यांनी थेट ‘होम डिस्ट्रिक्ट’च घेतले आहे. त्यात अ‍ॅन्टी करप्शन कारवाईशी संबंधित काही वादग्रस्त अधिकार्‍यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आता त्या अधिकार्‍यांनी ‘थेट पोस्टिंग’साठीच म्हणजे पोलिस ठाण्याचा इनचार्ज होण्यासाठी मोठी फिल्डिंग लावल्याची चर्चा पोलिस दलात दबक्या आवाजात सुरू आहे. 

एलसीबीत असताना सुमारे दोन वर्षांपूर्वी इचलकरंजीचा कार्यभार एका अधिकार्‍याकडे सोपविण्यात आला होता. अवैध मार्गाने गुटखा विक्री करणार्‍याकडे संबंधित अधिकार्‍यांनी चक्‍क 50 लाखांची ‘डीमांड’ केली होती. त्यासाठी तगादा लावला होता. अखेर वैतागलेल्या अवैध गुटखा विक्री करणार्‍या व्यक्‍तीने अ‍ॅन्टी करप्शनकडे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) तक्रार अर्ज दिला. त्यानुसार अ‍ॅन्टी करप्शनने सापळा रचला; परंतु अधिकार्‍यांना त्याची चाहूल लागली. संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्‍कमच स्वीकारली नाही. परिणामी, सापळा ‘फेल’ गेला; मात्र तक्रारीचे गांभीर्य ओळखून तत्कालीन वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यांची ‘डी. ई.’ (विभागीय चौकशी) लावली. त्यालाही संबंधित अधिकारी गैरहजर राहिले. अखेर वरिष्ठांनी अहवाल पाठवून थेट त्या अधिकार्‍यांना नागपूर दाखवले. त्यानंतरही ते अधिकारी तेथे रूजू झालेच नाहीत. काही कालावधी वैद्यकीय रजेवर घालवून अखेर त्यांनी वजन वापरत पुण्याला बदली करून घेतली.

त्यानंतर पोलिस निरीक्षकपदी प्रमोशन झाले. दोन वर्षांत पुन्हा ते कोल्हापुरात आले आहेत. नेसरीमधीलही त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरल्याचे सांगण्यात येते. सुमारे बारा वर्षांपूर्वी एलसीबीत एक कॉन्स्टेबल होते. अवैधरीत्या वाहनांत गॅस भरणार्‍या व्यावसायिकांकडून त्यांनी महिन्याला पाच हजाराचा हप्ता देण्यासाठी तगादा लावला. शिवाय, वारंवारच्या पैशाच्या मागणीला वैतागून संबंधित अवैध व्यावसायिकाने थेट अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार केली. त्यानुसार अ‍ॅन्टी करप्शनने सापळा रचून संबंधित कॉन्स्टेबलला रंगेहाथ लाच घेताना पकडले. त्यात त्या कॉन्स्टेबलला निलंबितही करण्यात आले. दरम्यानच्या कालावधीत त्याचे निलंबन रद्द झाल्यावर खात्यांतर्गत परीक्षा देऊन तो फौजदार झाला. त्यानंतर मुंबईत पोस्टिंग मिळाली. आता ते कॉन्स्टेबलचे सहायक पोलिस निरीक्षक झाले आहेत. विनंती अर्जाद्वारे त्यांनी कोल्हापूरला बदली करून घेतली आहे. थेट पोलिस ठाण्याचा इनचार्ज होण्यासाठी त्यांनी मोठी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. मात्र, असे अधिकारी आता कोल्हापुरात आल्याने अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार अर्ज देणार्‍यांचे धाबे दणाणल्याची चर्चा पोलिस दलात सुरू आहे.   

आठवड्याला हप्ता पाहिजे...

हप्ता म्हणजे आठवडा असे समजून दोन नंबर धंदेवाल्यांकडून संबंधित अधिकारी एंट्रीही आठवड्यालाच पाहिजे, असा असा तगादा असतो. सुरुवातीला डॅशिंग अधिकारी, गुन्हेगारांचा कर्दनकाळ असल्याचे संबंधित अधिकारी भासवतात. त्यानंतर हळूहळू सेटलमेंट सुरू होते. इचलकरंजीत असताना संबंधित अधिकार्‍यांनी वसुलीसाठी खासगी एजंट ठेवले होते, अशीही चर्चा आहे. हप्त्याच्या रकमेतून त्यांच्यात मोठा वाद झाला. तो टोकाला गेला होता, अशीही चर्चा आहे.