Thu, Jun 27, 2019 09:44होमपेज › Kolhapur › खते-जंतुनाशके उठली माणसांच्या मुळावर!

खते-जंतुनाशके उठली माणसांच्या मुळावर!

Published On: Jun 08 2018 1:22AM | Last Updated: Jun 08 2018 12:07AMकोल्हापूर : सुनील कदम

पंचगंगेच्या प्रदूषणामध्ये शेतीत वापरल्या जाणार्‍या रासायनिक खतांसह वेगवेगळ्या प्रकारच्या जंतूनाशकांचा फार मोठा वाटा आहे. रासायनिक खते आणि जंतुनाशकांमुळे होत असलेले नदीचे प्रदूषण मानवी आरोग्याच्या आणि एकूणच प्राणीमात्रांच्या जीविताच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरत आहे. त्यामुळे या प्रकारच्या प्रदूषणाचा सर्वच पातळीवरून गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.
पंचगंगा आणि तिच्या उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एकूण 3 लाख 65 हजार 876 हेक्टर बागायत क्षेत्र आहे. यामध्ये उसासह मोठ्या प्रमाणात फळभाज्या आणि पालेभाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची उपलब्धता मुबलक असल्यामुळे पंचगंगा खोर्‍यात सिंचनासाठी प्रामुख्याने परंपरागत पद्धतीचा म्हणजेच पाटाच्या पाण्याचा वापर केला जातो. मुबलक पाणी असल्यामुळे अधिकाधिक उत्पादनासाठी शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचाही वापर केला जातो. रासायनिक 

खतमिश्रीत हे पाणी पाझरून पुन्हा पंचगंगा आणि तिच्या उपनद्यांमध्ये मिसळून नदीचे पात्र प्रदूषित होताना दिसत आहे. अन्य कोणत्याही जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यातील रासायनिक आणि जंतुनाशकांचा वापर प्रचंड आहे.

पंचगंगा खोर्‍यातील रासायनिक खते आणि जंतुनाशकांचा प्रतिवर्षी वापर पुढीलप्रमाणे : रासायनिक खते - 78 हजार 244 टन, कीटकनाशके - 1 लाख 41 हजार 764 टन, तणनाशके - 34 हजार 995 टन आणि बुरशीनाशके - 6771 टन. याशिवाय जवळपास 45 ते 50 हजार लिटर द्रवरूप आणि विषारी स्वरूपाची कीटकनाशके वेगवेगळ्या पिकांवर आणि प्रामुख्याने भाजीपाल्यांवर फवारण्यासाठी वापरली जातात. बागायत शेतीचे प्रमाण विचारात घेता रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा हा वापर जवळपास दीडपटीने जादा असल्याचा निर्वाळा राज्याच्या कृषी विभागाने दिलेला आहे. रासायनिक खतांच्या या बेसुमार वापरामुळे जमिनीचा पोत बिघडता आणि तो सुधारण्यासाठी म्हणून शेतकर्‍यांकडून पुन्हा त्याचाच वापर होताना दिसतो आहे. पाण्याचा मुबलक आणि बेसुमार वापरामुळे ही रासायनिक खते आणि कीटकनाशके शेतीतून पाझरून पंचगंगा खोर्‍यातील नद्यांमध्ये मिसळताना दिसत आहेत. त्यामुळे नदीचे पात्र इतके प्रदूषित झाले आहे की आजकाल पंचगंगेचे पाणी शेतीसाठीसुद्धा वापरायच्या योग्यतेचे राहिलेले नाही. कारण या पाण्याचा वापर करून घेतल्या जाणार्‍या पिकांमध्ये या रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अंश आढळून येऊ लागला आहे. अशा पिकांचा आणि प्रामुख्याने भाजीपाल्याचा वापर मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचे संशोधनाअंती स्पष्ट झालेले आहे. एवढेच काय पण या पिकांचा चारा म्हणून वापर करणार्‍या जनावरांच्या दुधामध्ये सुद्धा या पदार्थांचे घातक अंश आढळून आलेले आहेत. 

एकेकाळी पंचगंगा काठचा भाजीपाला हा राज्यभर नावाजला जात होता. मात्र, या भाजीपाल्यामध्ये आरोग्यासाठी घातक स्वरूपाचे अंश आढळून आल्यामुळे अलीकडील काही वर्षांत पंचगंगेकाठच्या भाजीपाल्याचा राज्यभर दुर्लौकीक होताना दिसत आहे. पंचगंगाकाठचा भाजीपाला खाण्यात आल्यास कॅन्सर, मधुमेह, रक्तदाब आणि अन्य अनेक प्रकारचे आजार होण्याचा बोलबाला गेल्या काही दिवसांमध्ये सुरू असल्याचे दिसते. यामध्ये काही प्रमाणात तथ्य असल्याचेही दिसून येत आहे आणि याला कारणीभूत ठरत आहे. तो शेतीतील रासायनिक खते आणि जंतुनाशकांचा बेसुमार वापर. त्यामुळे भविष्यात शेतीतील रासायनिक खते आणि जंतुनाशकांचा वापर कमी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळावे लागणार आहे. पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पंचगंगाकाठच्या लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ती काळाची गरज आहे.