Thu, Jun 27, 2019 16:26होमपेज › Kolhapur › हवेत गोळीबार : हत्यारासह पेट्रोल पंप परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव

हवेत गोळीबार : हत्यारासह पेट्रोल पंप परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव

Published On: Jun 09 2018 1:34AM | Last Updated: Jun 09 2018 12:49AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

दाभोळकर कॉर्नर परिसरात हवेत गोळीबार केल्याप्रकरणी अटक केलेला मुकुंद रामचंद्र यादव (वय 47, रा. मंगळवार पेठ) व त्याचा भाचा सुशांत सुनील तडवळे (23, रा. शिवाजी पेठ) या दोघांना 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. गुरुवारी रात्री दाभोळकर कॉर्नरनजीक यादव याच्या पेट्रोल पंपाजवळ लघुशंका केल्याच्या संशयावरून अर्जुन रामचंद्र पाटील (वय 40, रा. कंदलगाव) यांना गजाने मारहाण करून त्यांच्यावर पिस्तुल रोखल्याप्रकरणी यादववर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. 

मुकुंद यादव याचा दाभोळकर कॉर्नर पादचारी पुलानजीकचा पेट्रोल पंप सध्या बंद असल्याने इथे खासगी आराम बस थांबतात. गुरुवारी रात्री फिर्यादी अर्जुन पाटील कामानिमित्त ट्रॅव्हल्सने बंगळूरला चालले होते. रात्री साडेअकरा वाजता पंपासमोर आराम बसमध्ये बॅग ठेवताना मुकुंद यादव पाठीमागून आला. ‘तू आमच्या पंपाच्या जागेत लघुशंकेला का उभारलास’ अशी विचारणा केली. या कारणावरून मुकुंद यादव आणि अर्जुन पाटील यांच्यात वाद झाला. 

 मुकुंदचा भाचा सुशांतने अर्जुनला लोखंडी गजाने मारहाण केली. यादवने स्वत: जवळील पिस्तुल अर्जुनवर रोखली. प्रसंगावधानता दाखवत ट्रॅव्हल्स मालकाने यादवचा हात पकडून वर केल्याने दोन राऊंड हवेत फायर झाले. हा प्रकार पाहून अनेकांचा थरकाप उडाला. जमलेले लोक सैरभैर धावत सुटले. 

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, तृप्ती देशमुख, रणजित पाटील घटनास्थळी आले. त्यांनी धाडसाने मुकुंद यादवच्या हातातील पिस्तुल हिसकावून घेतली. पिस्तुलसह 4 गोळ्या, 2 रिकाम्या पुंगळ्या पोलिसांनी जप्त केल्या.

पिस्टलचा परवाना रद्दसाठी जिल्हादंडाधिकार्‍यांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.