Sun, Nov 18, 2018 13:23होमपेज › Kolhapur › कोल्हापूरकरांनी शौर्य, माणुसकीचे दर्शन घडवले : डॉ. योगेश जाधव

कोल्हापूरकरांनी शौर्य, माणुसकीचे दर्शन घडवले : डॉ. योगेश जाधव

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 30 2018 12:16AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर हे शौर्य आणि माणुसकी यासाठी प्रसिद्ध आहे, याची प्रचिती देत शुक्रवारी रात्री शिवाजी पूल अपघातात कोल्हापूरकरांनी त्याचे दर्शन घडवले, असे गौरवोद‍्गार दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांनी काढले. या अपघातात धाडसाने पुढे जात, मदत करत तिघांचा जीव वाचवणार्‍या तरुणांचा दैनिक ‘पुढारी’च्या वतीने सोमवारी सत्कार करण्यात आला. 

डॉ. जाधव म्हणाले, केवळ वेळेत मदत मिळत नाही म्हणून होणार्‍या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. मोठ्या शहरात तर हा प्रकार सर्रास दिसतो. मात्र, त्याला आपल्यासारख्या तरुणांमुळे कोल्हापूर अपवाद ठरत आले आहे. परिस्थिती भयावह आणि धोकादायक असतानाही, जीवाची पर्वा न करता, ज्या धाडसाने मदतीचे कार्य केले, त्याला तोडच नाही. 

तरुणांनी सार्वजनिक हितासाठी सदैव पुढेच राहिले पाहिजे, असे सांगत डॉ. जाधव म्हणाले, शुक्रवारी रात्री ज्या परिस्थितीत तरुणांनी जे काम केले, त्यांचे हे कार्य सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. अशीच एकजूट कायम ठेवा, मदतीसाठी सदैव अग्रेसरच रहा. तरुणांची संस्था उभा करून, त्याद्वारे कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापनाचे काम करा, असे आवाहनही डॉ. जाधव यांनी यावेळी केले. दैनिक ‘पुढारी’ असे काम करणार्‍यांमागे खंबीरपणे उभे असते, यापुढेही ‘पुढारी’ परिवार सदैव सोबत राहील, अशी ग्वाहीही डॉ.जाधव यांनी दिली.

मानाचा कोल्हापुरी फेटा, शाल, श्रीफळ देऊन माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, प्रवीण डांगे, कुणाल भोसले, सुशांत महाडिक, केदार शिंदे, महेश शिंदे, योगेश यादव, श्री. पाटील, आदित्य फराकटे, महावीर पोवार, विनायक नाईक, आशिष घोलप, राकेश शिंदे, अक्षय नाईक यांचा डॉ. जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘पुढारी’ने कौतुकाची थाप पाठीवर दिल्याने आमचे बळ आणखी वाढले आहे. असाच ‘पुढारी’चा हात पाठीवर खंबीरपणे राहू दे, अशा भावना यावेळी तरुणांनी व्यक्‍त केल्या.

अंगावर शहारे निर्माण करणार्‍या या अपघाताच्या मदतकार्याच्या आठवणी यावेळी सांगण्यात आल्या. जितके प्रवासी बाहेर काढता येतील, तितके ते काढण्याचे प्रयत्न केले. गाडीत शिरल्याने काहींसे गुदमरल्यासारखे होत होते. यामुळे  काहींना काढता आले नाही. यावेळी वेळेत बोट आली असती तर आणखी काहींना वाचवता आले असते, अशी खंत यावेळी तरुणांनी व्यक्‍त केली. आपत्ती व्यवस्थापनाचे काम, नव्या पुलाचे रखडलेले काम, अपघातानंतर निर्माण झालेला हद्दीचा वाद, शिवाजी पुलावरील वस्तुस्थिती आदींबाबत यावेळी तरुणांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.

पुलाची परिस्थिती पाहता, लोकांनीच या पुलावरून जाऊ नये, असे आवाहनही यावेळी तरुणांनी केले. नव्या पुलाबाबत तातडीने निर्णय घेऊन काम सुरू करावे, असे आवाहनही त्यांनी केले.