Wed, Jul 17, 2019 12:23होमपेज › Kolhapur › पाचगावात पुन्हा दहशतीचे सावट!

पाचगावात पुन्हा दहशतीचे सावट!

Published On: May 22 2018 1:25AM | Last Updated: May 22 2018 12:35AMकोल्हापूर : दिलीप भिसे

पाचगाव (ता. करवीर) येथील सत्तासंघर्षातील सूडनाट्य थंडावले असतानाच पिस्तुलातून गोळ्या झाडून पाचगाव येथील तरुणाचा पोलिस रेकॉर्डवरील सराईताने जरगनगर येथे भरचौकात अमानुष खून केल्याने परिसरात पुन्हा दहशतीचे सावट निर्माण झाले आहे. घटनेत बळी गेलेला तरुण आणि मारेकरी याच परिसरातील ग्रामस्थांची पुन्हा डोकेदुखी वाढली आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी धडपडणार्‍या प्रयत्नांना या कृत्यामुळे बाधा निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

पाचगाव येथील राजकीय सत्तासंघर्षातून दोन गटांत निर्माण झालेल्या सूडचक्राचा ग्रामस्थांना अनेक कटू अनुभवांना सामोरे जावे लागले आहे. पाचगाव येथील दोन गाजलेल्या खून प्रकरणात न्यायालयाने दोनही गटांतील प्रमुखासह अकरा जणांना दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सर्वच आरोपी सध्या कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

राजकीय संघर्षामुळे पाचगाव येथील कायदा-सुव्यवस्थेविषयी सर्वच स्तरावर गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. कोणताही उत्सव, कार्यक्रम असो अथवा सभा समारंभाचे नियोजन झाले की पोलिस यंत्रणेवर त्याचा ताण पडायचा. एव्हाना, एखाद्या सेवा सोसायटीची निवडणूक लागली तरी प्रशासन यंत्रणेची तारांबळ उडायची हे चित्र शहरासह जिल्ह्यानेही अनुभवले आहे.

गावात शांतता-सुव्यवस्था प्रस्थापित करून निर्भय व सलोख्यासाठी ज्येष्ठ मंडळीसह तरुणाचा पुढाकार दिसून येत आहे. स्थानिक पातळीवरील वाद-विवाद गावातच मिटवून गुण्या-गोविंदाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच गावातील दोन तरुणामध्ये जीवघेणा संघर्ष घडल्याने समन्वयाच्या प्रयत्नाला बाधा निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मात्र, अशा घटनांना थारा न देता गावच्या भल्यासाठी सलोख्याचे प्रयत्न अविरतपणे चालूच ठेवण्याचा निर्धार व्यक्‍त होत आहे. 

प्रतीक ऊर्फ चिंटू प्रकाश पोवार हा मूळचा शिवाजी पेठेतील असला तरी त्याचे कुटुंबीय 15 वर्षांपासून पाचगाव येथील शांतादुर्गा कॉलनीतील द्वारकानगर येथे वास्तव्याला आहेत. तर संशयित मारेकरी प्रतीक सुहास सरनाईक हा पाचगाव येथील साईनगरात स्थयिक आहे. दोनही गटातील बहुतांशी समर्थक पाचगाव परिसरातील आहेत. पोवारचा खून पूर्ववैमनस्यातून झाला की, टोळीयुद्धातून झाला यापेक्षा जरगनगरात पिस्तुलातून गोळ्या झाडून तरुणाचा झालेला खून सामाजिक स्वास्थ्य बिघडविणारा आहे. अशा गंभीर घटनामुळे पाचगावात पुन्हा दहशतीचे सावट निर्माण होणार नाही,याची सार्‍यानीच दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.