Wed, Apr 24, 2019 07:43होमपेज › Kolhapur › शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढताहेत

शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढताहेत

Published On: Aug 25 2018 1:14AM | Last Updated: Aug 24 2018 11:30PMकोल्हापूर : अनिल देशमुख

राज्यातील सधन जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. उपलब्ध साधनसामग्रीचा कुशलतेने वापर करत शेतीचे उत्पन्न घेणारा शेतकरी म्हणून जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडे पाहिले जाते. दूध व्यवसायासह विविध कृषीपूरक व्यवसायांची जोड देत जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी कोल्हापूरची सुजलाम्-सुफलाम् प्रतिमा जपण्याचा आजवर प्रयत्न केला आहे. मात्र, वाढते नागरीकरण, पिकांना मिळत नसलेले हमीभाव, वाढती महागाई आदीने जिल्ह्यातील अनेक शेतकरी मेटाकुटीला आल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपासून दिसत आहे.

जिल्ह्यात 2004 साली दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्येची सरकार दफ्तरी नोंद झाली. त्याच्या पुढच्या वर्षी तीन शेतकर्‍यांनी जीवनयात्रा संपवली. त्यानंतर मात्र 2006 ते 2009 या चार वर्षांचा कालावधी जिल्ह्यासाठी अधिक वेदनादायी ठरला. या चार वर्षांत जिल्ह्यात 59 शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या. 2010 पासून मात्र शेतकर्‍यांच्या या आत्महत्येचा आलेख कमी होऊ लागला. 2010 साली 7, तर 2011 साली 5, त्यानंतर 2012 व 13 साली प्रत्येकी दोन आत्महत्यांची नोंद झाली. 2014 साली तर एकही आत्महत्या झाली नाही.
जिल्ह्यात सुखद असे चित्र दिसत असतानाच पुन्हा 2015 पासून जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा आलेख वाढू लागला आहे. 2015 साली जिल्ह्यात 9 शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची नोंद झाली. 2016 साली चार आत्महत्या झाल्या, तर गेल्यावर्षी 11 शेतकर्‍यांच्या आत्महत्येची नोंद झाली. यावर्षी जानेवारी ते जून या अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत 9 शेतकर्‍यांच्या आत्महत्येची नोंद झाली आहे. ही आकडेवारी जिल्ह्यासाठी भूषणावह तर नाहीच; पण सर्वांसाठीच चिंताजनक आहे. शेतकर्‍यांच्या समस्या, त्यावरील प्रभावी उपाययोजना आणि त्यांची तितक्याच प्रभावी अंमलबजावणीची गरज आहे.

जिल्ह्यात कृषी कर्जवाटपात काही बँकांनी हात आखडते घेतले होते. मात्र, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी थेट कारवाईचा इशारा दिल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत पीक कर्जवाटपाची आकडेवारी तिप्पट झाली. शेतकर्‍यांसाठी असलेल्या योजनांची अशाच प्रकारे अंमलबजावणी होण्याची गरज आहे. यादृष्टीने लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेने समन्वयाने, नियोजनपूर्वक काम करण्याची गरज आहे. मराठवाडा, विदर्भात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. तेथील भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. तशी परिस्थिती जिल्ह्यात नाही, तरीही शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत असल्याने त्यावर सर्वांनीच गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.