Sun, Jul 21, 2019 02:06होमपेज › Kolhapur › कर्जमाफीवरून शेतकर्‍यांची थट्टा : आ. मुश्रीफ

कर्जमाफीवरून शेतकर्‍यांची थट्टा : आ. मुश्रीफ

Published On: Dec 10 2017 1:19AM | Last Updated: Dec 09 2017 11:29PM

बुकमार्क करा

कागल : प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचे पैसे येणार आहेत, बँक उघडीच ठेवा असे सरकारने सांगितले, या आशेने बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी रात्रभर बँक उघडी ठेवून रात्र जागून काढली. मात्र, पैसे काही आले नाहीत. यामुळे शासन शेतकर्‍यांची थट्टा करीत आहे. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी नागपूर अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी पक्षाचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला. कागल येथील त्यांच्या निवासस्थानी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  

यावेळी बोलताना आ. मुश्रीफ म्हणाले, शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचे पैसे येणार आहेत. रात्रन्दिवस बँक सुरूच ठेवा, असे सांगण्यात आले. कर्जमाफीवरून अधिवेशनामध्ये काही गडबड होऊ नये म्हणून सरकार कर्जमाफीचे पैसे देणारच, या आशेने बँक उघडी ठेवण्यात आली. रात्रभर अधिकारीवर्ग जागत राहिला; पण कर्जमाफीचे पैसेच आले नाहीत. या प्रकारामुळे शेतकर्‍यांची भाजप सरकार थट्टा करीत आहे, असे स्पष्ट करून ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने हल्‍लाबोल आंदोलन करण्यात येत आहे. यामधून विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

त्यातील एक मागणी मान्य करण्यात आली. ऊसकरी शेतकर्‍यांच्या कर्जाची तारीख बदलली. मात्र, खावटी कर्ज आणि अपात्र कर्जमाफीबाबत निर्णय घेण्यात आला नाही, तसेच पती-पत्नी कर्जाच्या थकबाकी कर्जाबाबत आता अधिवेशनामध्ये आवाज उठविणार आहे. शासनाच्या कर्जमाफीच्या अटीनुसार सरकारी, निमसरकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व इतर पदाधिकारी यांना कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी असले, तरी ते श्रीमंत नाहीत, त्यामुळे सरसकट सात-बारा कोरा झालाच पाहिजे, हे ब्रीद वाक्य आहे.

भाजप सरकारविरोधात सध्या वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने राज्यभर हल्‍लाबोल आंदोलन सुरू आहे. वर्ध्याला हल्‍लाबोल दिंडीमध्ये सहभागी होऊन दोन किलोमीटर चालत गेलो होतो. आता प्रचंड विराट रॅली काढली जाणार आहे, असे ते म्हणाले.

पोलिसांच्या तपासाविषयीच शंका

कागल नगरपालिकेच्या कार्यालयाला लागलेल्या आगीचा तपास सुरू  असल्याचे पोलिस सांगतात, पुढे काहीच बोलत नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या तपासाविषयी शंका येऊ लागली आहे, असे मत आ. हसन मुश्रीफ यांनी व्यक्‍त केले. महिना होत आला, तरीदेखील पोलिसांना आग कशाने लागली? याचा शोध लागला नाही. आगीची तत्काळ चौकशी करण्यात यावी, याबाबत वारंवार पोलिसांना सांगितले आहे. मात्र, तपासाबाबत पोलिस काहीच बोलत नाहीत. सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे म्हणतात, तर त्याची चौकशी करण्यात यावी, आग लागली की लावली, याचा तपास व्हायलाच हवा.