Thu, Jul 18, 2019 02:05होमपेज › Kolhapur › टोमॅटो पिकात घातल्या शेळ्या

टोमॅटो पिकात घातल्या शेळ्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

दानोळी : वार्ताहर

टोमॅटो व फ्लावरचे दर कोसळल्याने शेतकर्‍यांनी उभ्या टोमॅटो पिकात शेळ्या घालून पीक चारत असल्याचे पाहवयास मिळत आहे. फ्लावर क्षेत्रात रोटर फिरवत आहेत. तसेच हंगाम संपत आल्यानेही व कडक उन्हामुळे फळ कोमेजत असल्याने शेतकरी क्षेत्र रिकामे करीत आहेत असे चित्र आहे.टोमॅटोचे दर तीन आणि चार रुपये किलोवर आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पादक खर्चही निघत नाही. सुरुवातीला दर मिळाला मात्र आता दरात कमालीची घसरण झाली आहे. सद्या हंगामाच्या शेवटी शेतीमाल काढणे तो बाजारात पाठविणे या खर्चाचा ताळमेळ सद्या विस्कटले आहे. दुय्यम माल निघत असल्यानेही त्याला बाजारपेठेत दर मिळत नाही. दर नसल्याने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे काढणी खर्च अंगावर पडण्यापेक्षा खरीपासाठी क्षेत्र मोकळे करण्यासाठी पिकात जनावरे सोडण्यात येत आहेत.

गेल्या दोन तीन वर्षांत या परिसरात टोमॅटो पिकासाठी पोषक वातावरण नाही. बेभरवशाचा पाऊस, पाण्याची कमतरता. तसेच कारप्या, दावण्या, लाल आळी, मूळ कुजव्या, मूटर्‍या आदी आटोक्यात न येणारे रोग यामुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. टोमॅटो उत्पादनासाठीचा खर्च हा मोठ्या प्रमाणावर आहे.लागणारे तरू (रोपे), औषधे, किटकनाशके, तार, काठी, सुतळी, माल बाजारपेठेत नेण्यासाठी लागणारे बकेट (कॅरेट) व वाहतूक खर्च हा लाखो रुपयांचा असतो. सध्या रोज येणार्‍या नवीन रोगापासून टोमॅटो फड वाचवण्यासाठी शेतकर्‍याला तारेवरची कसरत करावी लागते आणि उत्पादन चागले झालेच तर बाजारपेठेत त्याला मिळणारा दर याचा ताळमेळ घालणे शेतकर्‍यांना न परवडणारे आहे. शेतातील तयार माल काढणे देखील शेतकर्‍यांवर भुर्दंड बसत आहे. काढणी खर्च देखील  परवडत नाही. दर नसल्याने सद्या टोमॅटो हे बेभरवशाचे पीक ठरले आहे. शेतकरी ऊस, केळी अशा पिकांकडे वळला आहे.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Farmers, shocked, tomato, prices, three, four, rupees per kg


  •