Tue, Jul 16, 2019 01:48होमपेज › Kolhapur › शेतकर्‍यांनी जागरूक होणे आवश्यक : चंद्रकांत पाटील 

शेतकर्‍यांनी जागरूक होणे आवश्यक : चंद्रकांत पाटील 

Published On: May 07 2018 2:02AM | Last Updated: May 07 2018 1:14AMनेसरी : वार्ताहर

गेल्या अनेक पिढ्या शेतकरी केवळ पिढीजातपणे शेती करीत आहे. आता शेतकर्‍यांनी जागरूक होणे आवश्यक आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळवून श्रीमंत व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे रमेशराव रेडेकर युवा फौंडेशनच्या वतीने समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत ई-मोबाईल पशुचिकित्सालयाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार पाशा पटेल होते.

जिल्हा परिषद सदस्या अनिता चौगुले यांनी स्वागत केले. प्रास्ताविक पी. डी. पाटील यांनी केले. यावेळी रेडेकर फौंडेशनचे अध्यक्ष रमेश रेडेकर म्हणाले, गडहिंग्लज आणि चंदगडच्या पूर्व भागात पाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे. या ठिकाणी जोडधंदा असलेल्या पशुव्यवसायाला अत्याधुनिकपणाची जोड नसल्याने समस्या येत आहेत. हे पशुधन वाचले तर शेतकरी राजा सुखी होऊ शकतो.

पालकमंत्री पाटील म्हणाले, शेतकरी श्रीमंत झाला पाहिजे यासाठी राज्य शासन वेगवेगळे प्रयोग राबवित आहे. शेतकर्‍यांच्या शेतातील एकही उत्पन्न वाया जाऊ नये, असे प्रयत्न सुरू आहेत. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी राज्य शासनाने नवा प्रयोग हाती घेतला असून त्याची प्रायोगिक चाचणी झाली आहे. येत्या हंगामापासून त्याचा प्रत्यक्ष वापर काही ठिकाणी करण्याबाबतही प्रयत्न सुरू आहेत.

कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष आमदार पाशा पटेल म्हणाले, शेतकर्‍यांची गुरुकिल्‍ली म्हणजे पशुधन असून हे पशुधन वाचविण्यासाठी रेडेकर यांनी केलेले कार्य शासनापेक्षा वेगळे आहे. यामुळे आगामी काळात शेतकर्‍यांना आपल्या पशुधनावरच फोकस करून काम करावे लागणार आहे. आ. सुरेश हाळवणकर म्हणाले,  या नव्या यंत्रणेमुळे जनावरांनाही मायेचा हात मिळणार असून त्याचा थेट फायदा शेतकर्‍यांना होणार आहे. 

आ. अमल महाडिक यांचेही यावेळी भाषण झाले. प्रारंभी रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते ई-मोबाईल पशुचिकित्सालयाचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला गोकुळ संचालक बाबा देसाई, गोपाळ पाटील, आजर्‍याच्या नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, जिल्हा परिषद सदस्या सुनीता रेडेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार आदित्य रेडेकर यांनी मानले.