Tue, Mar 19, 2019 09:27होमपेज › Kolhapur › सरकारने शेतकर्‍यांच्या आयुष्याची वाट लावली : उद्धव

सरकारने शेतकर्‍यांच्या आयुष्याची वाट लावली : उद्धव

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कुडित्रे : प्रतिनिधी

काँग्रेस आणि राष्ट्रवादी नको म्हणून शिवसेनेने भारतीय जनता पक्षाशी युती केली. ती यांनीच तोडली. काळ्या मांजराप्रमाणे अपशकुन नको म्हणून सरकारला समर्थन दिले; पण या कपाळकरंट्या सरकारने शेतकरी, कामगार व जनतेच्या आयुष्याची वाट लावली, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. कुडित्रे (ता. करवीर) येथे कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित शेतकरी मेळाव्यात ठाकरे बोलत होते.

ठाकरे म्हणाले, सरकार स्थापनेच्या तीन वर्षांनंतर आपण राज्यभर फिरतो आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात शेतकरी व जनतेचे जे प्रश्‍न होते, तेच कायम आहेत. सरकारच्या कामाच्या दुष्काळामुळेच माझ्यावर निवेदनाचा पाऊस पडतो आहे. हेच गठ्ठे घेऊन मी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन जाब विचारणार आहे. जनतेने मोठ्या अपेक्षेने निवडून दिले आहे. चांगले केले तर गोडवे गाईन, नाही केले तर जोडे मारीन.

दररोज आठ शेतकरी गळफास घेतात. कर्जबाजारीपणा हे निव्वळ सरकारचे पाप आहे. माझा शेतकरी पळपुटा नाही. तो दारूचे उत्पादन करीत नाही. तो राबून सोनं पिकवितो. ज्यांनी बँका बुडविल्या त्यांना कर्जमाफी, शेतकर्‍यांना कर्जमुक्‍ती केली नाही, तर खरंच मी नाराज आहे. पुरेशा दाबाने, अखंड वीज, तीही दिवसा दिली नाही तर मी नाराज आहे. मुलींना शाळेत जायला पैसे नसतील म्हणून आत्महत्या करीत असतील, तर मी नाराज आहे. अशा राज्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे.

दहशतवाद मोडला नाही, वाढला!

नोटा बंदीमुळे दहशतवाद्यांचा बीमोड झाला नाही, तो जवानांच्या शौर्यामुळे होतो. नोटा बंदीमुळे प्रगती होत असती, तर प्रगत देशांनी ती केली असती; पण नोटा बंदीमुळे वेश्या व्यवसायाला चाप बसला. असा अजब शोध लावणार्‍या केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला.

छत्रपतींची बदनामी नको!

सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी योजना काढली. शिवसेनेला कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्‍ती हवी होती. गणपती गेेले, नवरात्र संपले, दिवाळी झाली तरी अजून एकही शेतकरी कर्जमुक्‍त झालेला पाहिला नाही. करंट्या सरकारमुळे छत्रपतींचे नाव मात्र बदनाम होत आहे. उसाचे आंदोलन झाले; पण हेच सरकार शेतकर्‍यांच्या छातीवर नको, पायावर गोळ्या घाला, असा अजब सल्‍ला देत आहे.

मुख्यमंत्री कोण?

इरिगेशन फेडरेशनने दिलेल्या निवेदनावरील मुख्यमंत्र्यांचा लेखी आदेश डावलून वीज दरवाढ केली. मुख्यमंत्र्यांच्या सहीला किंमत नाही, मग राज्य कोण चालवते, मुख्यमंत्री की चंद्रकांतदादा, अशी उपरोधिक टोला ठाकरे यांनी हाणला.

शेतकर्‍यांना वाचवणे  हेच आमचे हिंदुत्व!

आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत आहोत. केवळ गायीला वाचवणे म्हणजे हिंदुत्व नव्हे, तर शेतकर्‍याला वाचवणे याला आम्ही हिंदुत्व मानतो. तिहेरी तलाक बंदी करणार असाल, तर समान नागरी कायदा, मंदिर विधेयक का आणत नाही, असा सवाल करून महाराष्ट्राला गायीला गोमाता म्हणता मग गोव्यात का खाता, हे सर्व थोतांड आहे, अशी टीका उद्धव यांनी केली.

ठाकरे म्हणाले कोल्हापूरला पालकमंत्री दिला आहे. मला शिवसेनेकडून केवळ मंत्री नको, तर मुख्यमंत्री हवा. जिल्हा भगवा करा, राज्यात सेनेचे सरकार आणा, मग हवे ते मागा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात आ. चंद्रदीप नरके यांनी सरकारच्या साखर साठ्यावरील निर्बंध, दीर्घकालीन स्थिर धोरणाचा अभाव यामुळे साखर उद्योग संकटात असल्याचे सांगून हा उद्योग वाचला नाही, तर महाराष्ट्रातील 65 लाख कुटुंबातील सुमारे अडीच कोटी जनता देशोधडीला लागेल, अशी भीती व्यक्‍त केली. सहवीजप्रकल्प अनुदान, साखर साठ्यावरील निर्बंध दूर करणे याबाबत ठाकरे यांनीच मुख्यमंत्र्यांशी बोलून साखर उद्योग सावरण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. रात्रीचा वीजपुरवठा, वीज दरवाढ, शेतमालाला हमीभाव, खरेदी केंद्रांचा अभाव या शेतकर्‍यांच्या समस्यांचा ऊहापोह करून धामणी प्रकल्पाला निधी देण्याची मागणी केली.

आभार कारखान्याचे उपाध्यक्ष दादासाहेब लाड यांनी मानले. या कार्यक्रमास खा. गजानन कीर्तीकर, खा. विनायक राऊत, संजय मंडलिक, जया शिवतारे, आ. सुजित मिणचेकर, आ. प्रकाश आबिटकर, आ. सत्यजित पाटील, विजय देवणे, संजय पवार, संजयबाबा घाटगे, जि. प. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, मुरलीधर नाईक, वैभव नाईक, संग्राम कुपेकर, बाबासो पाटील - भुयेकर, अमरिश घाटगे, जि. प. सदस्य मनीषा कुरणे, कोमल मिसाळ, कारखान्याचे संचालक, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.