Fri, Apr 26, 2019 19:19होमपेज › Kolhapur › सोशल मीडियावर ‘फेक’ अकाऊंटचा धिंगाणा

सोशल मीडियावर ‘फेक’ अकाऊंटचा धिंगाणा

Published On: Aug 31 2018 1:39AM | Last Updated: Aug 31 2018 12:14AMकोल्हापूर : विजय पाटील

रिकामटेकड्या सुग्याला एक मुलगी आवडते; पण ती मुलगी याला काडीचाही भाव देत नाही. चिडलेल्या सुग्याने तिचा फोटो कॉपी करून सोशल मीडियावर तिच्या नावाने फेक अकाऊंट तयार करून तिची बदनामी सुरू केली. त्या मुलीने धाडसाने पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदवल्याने सुग्या आता कस्टडीत मान खाली घालून बसलाय. सोशल मीडियाचा वापर कसा गुन्हेगारीला खतपाणी घालण्यासाठी होत आहे, याचे एक प्रातिनिधिक उदाहरण. 

सायबर गुन्हे वाढले आहेत. कारण प्रत्येकाच्या हातात सहजपणे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तंत्रज्ञान हे माणसाचे काम सहजसोपे व्हावे म्हणून वापरण्यासाठी आहे. तसेच तंत्रज्ञानाच्या वापराने जितके चांगले करता येईल, तितके चांगले करण्यासाठी त्याचा उपयोेग व्हावा, हा उदात्त हेतू आहे; पण अलीकडे काही भामट्यांकडून तंत्रज्ञानाचा गैरवापर सुरू आहे. मुली आणि महिलांच्या बदनामीसाठी सोशल मीडियावर फेक अकाऊंट काढून बदनामीचे अस्त्र म्हणून याचा वापर वाढू लागला आहे. दुसर्‍या बाजूला सामाजिक, राजकीय तसेच इतर क्षेत्रांतील प्रतिष्ठितांचे अवमूल्यन करण्यासाठीही याचा वापर केला जात आहे. 
फेक अकाऊंटचा सर्वात जास्त वापर महिलावर्गाच्या बदनामीसाठी होत असल्याचे याबाबत नोंदवल्या जात असलेल्या गुन्ह्यांवरून दिसून येते. तसेच काही मुले मित्रांची चेष्टा करण्यासाठी मुलींचे अकाऊंट तयार करतात. आणि त्या अकाऊंटच्या माध्यमातून मित्रांशी मुलगी असल्याचे भासवत चॅटिंग करतात. दुसर्‍या मुलींचे फोटो शेअर करतात. अनेक मुले अशा फेक मुलींमध्ये भावनिकद‍ृष्ट्या गुंततात. जेव्हा खरी परिस्थिती समोर येते तेव्हा अनेकजण डिप्रेशनमध्ये जात असल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दुसर्‍या बाजूला अनेक मुली जलसीच्या कारणावरून मैत्रिणींचेच फेक अकाऊंट काढून त्यांच्या बदनामीचे उद्योग करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

तक्रार करावी, कारवाई होते
फेसबुकला जर तक्रार केली तर अशी अकाऊंट ब्लॉक केली जातात. त्यामुळे फेक अकाऊंट असल्याचा संशय आल्यास तत्काळ तक्रार करावी. यासह पोलिसांकडे याबाबत तक्रार नोंदवायला हवी. अशा घटना वाढत असल्याने याबाबत जनजागृतीची गरज आहे.
- विनय गुप्ते (आय.टी. अभ्यासक)

जगात 20 कोटींहून अधिक  फेक अकाऊंट
जगात फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटचे 20 कोटींहून अधिक फेक अकाऊंट असल्याची माहिती फेसबुकनेच मध्यंतरी जाहीर केली होती.

 मुलींनी थेट तक्रार केली पाहिजे
सोशल मीडियावरून मुली आणि महिलांच्या तक्रारी वाढत आहेत. आमच्याकडे वर्षभरात सरासरी 45 तक्रार अर्ज येतात. चौकशीनंतर बदनामी करणारा मुलगा किंवा मुलीचीच मैत्रीण किंवा ओळखीची असल्याचे स्पष्ट होते. यानंतर मात्र तक्रार करणारे गुन्हा नोंदवत नाहीत. गुन्हा नोंद होत नसल्याने धाडस वाढत आहे. यासाठी मुलींनी थेट तक्रार करावी...
- शीतल जाधव (पोलिस उपनिरीक्षक, सायबर सेल) 

3 वर्षांचा कारावास
फेक अकाऊंट तयार करणार्‍या आरोपीस आय.टी. अ‍ॅक्ट 66 (सी) कलमान्वये तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे...