Tue, Jul 16, 2019 09:37होमपेज › Kolhapur › फेसबुकच्या ‘चेहर्‍यावर’ संशयाचे डाग

फेसबुकच्या ‘चेहर्‍यावर’ संशयाचे डाग

Published On: Mar 22 2018 1:32AM | Last Updated: Mar 22 2018 1:32AMकेम्ब्रिज अ‍ॅनालॅटिका कंपनीविषयी

केम्ब्रिज अ‍ॅनालॅटिका ही एससीएल समूहाची कंपनी असून अन्‍नप्रक्रियापासून ते सुरक्षा क्षेत्रात हा समूह काम करतो. प्रामुख्याने  राजकीय  डाटा विश्‍लेषणात ही कंपनी आघाडीवर आहे. अमेरिकन निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 2013 साली केम्ब्रिज अ‍ॅनालॅटिका ही कंपनी सुरू करण्यात आली. आपल्या राजकीय आणि कॉर्पोरेट ग्राहकांना संशोधन, इतर डाटासंदर्भातील सेवा कंपनीतर्फे दिल्या जातात. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, लंडन, ब्राझील आणि मलेशियात कंपनीची कार्यालये आहेत. 

कधी आली प्रकाशझोतात

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना मदत केल्याचे श्रेय या कंपनीला दिले जाते; पण हे करताना कंपनीने फेसबुकवरील पाच कोटी युजर्सच्या डाटाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. हा डाटा वापरून मतदारांवर प्रभाव टाकण्यात आला. यासंदर्भात ‘चॅनेल 4’ वृत्तवाहिनीने एक स्टिंग ऑपरेशन केले होते. संबंधित पत्रकाराने स्वतःला श्रीलंकेतील व्यावसायिक असल्याचे सांगून स्थानिक निवडणुकीवर प्रभाव टाकण्याची इच्छा व्यक्‍त केली. केम्ब्रिज अ‍ॅनालॅटिकाचे बॉस अलेक्झांडर निक्स यांची कंपनी कशा पद्धतीने विविध बदनामीकारक मोहिमांची व्यवस्था करून विरोधकांची प्रतिमा डागाळू शकते, हे या व्हिडीओत सांगत असल्याचे दाखवण्यात आले. अर्थात, कंपनीने हे स्टिंग ऑपरेशन चुकीचे असल्याचा दावा केला आहे.

फेसबुकचा संबंध काय?

2014 केम्ब्रिज विद्यापीठातील अलेक्झांडर कोगन यांनी एक अ‍ॅप विकसित केले होते. आपले व्यक्‍तिमत्त्व कसे आहे हे जाणून घ्या, असे ते अ‍ॅप होते आणि त्यात युजरला विविध प्रश्‍न विचारले जात होते. आपल्या फेसबुक खात्याशी लिंक करून कोट्यवधी युजर्सनेही या अ‍ॅपचा वापर केला.
या अ‍ॅपने केवळ डाऊनलोड केलेल्या युजर्सचीच नव्हे, तर त्यांच्या मित्रांची माहितीही एकत्रित केली होती. कोगन यांनी ही सर्व माहिती केम्ब्रिज अ‍ॅनालॅटिका यांना दिल्याचे फेसबुक आणि अ‍ॅनालॅटिकाचेही म्हणणे आहे. कोगन यांनी फेसबुकच्या नियमांचा भंग केला अथवा नाही, याची माहिती आम्हाला नसल्याचे केम्ब्रिज अ‍ॅनालॅटिकाने म्हटले आहे.
अ‍ॅप, माहिती डीलीट
फेसबुकचे म्हणणे आहे की, त्यांच्या नियमांचा भंग झाला होता हे जेव्हा त्यांना कळले, तेव्हा त्यांनी 2015 सालीच अ‍ॅप हटवले आणि त्यासंदर्भातील माहितीही डीलीट केली. फेसबुकच्या माध्यमातून मिळालेली ही माहिती कधीही वापरली नाही आणि फेसबुकने सांगितल्यानंतर त्यांनी सगळी माहिती डीलीट करून टाकली, असा दावा केम्ब्रिज अ‍ॅनालॅटिकाने केला आहे.

पुढे काय झाले?

फेसबुकने आपल्या पातळीवर याचा तपास सुरू केला आहे. केम्ब्रिज अ‍ॅनालॅटिका, त्यांची मूळ कंपनी एससीएल, कोगेन आणि यासंदर्भातील इतरांना ब्लॉक केल्याचे फेसबुकने म्हटले आहे. दुसरीकडे याप्रकरणी इंग्लंडच्या माहिती आयुक्‍तांनी केम्ब्रिज अ‍ॅनालॅटिकाच्या कार्यालयाची झडती घेण्याची नोटीस बजावली आहे. यादरम्यान फेसबुकने आपल्या स्वत:ची चौकशी थांबवावी, असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, फेसबुकने बुधवारी एक निवेदन जारी करून आपली फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. लोकांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचेही म्हटले आहे. या प्रकरणानंतर फेसबुकवर जगभरातून टीका होत असून, युरोपियन संघ आणि ब्रिटिश संसदेने संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. अमेरिकेतही फेसबुकविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली आहे.

फेसबुकचा वापर करताना काय काळजी घ्याल?

फेसबुकवर अनेक अ‍ॅपची लिंक टाकलेली असते. मात्र, ही लिंक ओपन करताना किंवा अ‍ॅप डाऊनलोड करताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे. त्यासाठी फेसबुकवरही काही सेटिंग दिलेल्या असतात.  फेसबुक लॉग इन करा आणि सेटिंगमध्ये जा त्यानंतर अ‍ॅप्सवर क्लिक करा. आता अ‍ॅप्स, वेबसाईट आणि प्लगईनच्या खाली दिलेल्या एडिट बटणावर टॅप करा आणि त्यासमोरील डिसेबल या बटणावर क्‍लिक करा.असे केल्याने तुम्हाला फेसबुकवर कोणाही थर्ड पार्टी अ‍ॅपचा किंवा वेबसाईटचा वापर करता येणार नाही.बर्‍याचदा एखाद्या अ‍ॅप किंवा गेममध्ये लॉगईन करण्यासाठी फेसबुकचा पर्याय दिलेला असतो. मात्र, असे करणे तुमच्या माहितीच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते.  फेसबुकने लॉगईन करण्यामुळे युजर्स अ‍ॅप डेव्हलपरला आपल्या फेसबुक प्रोफाईलमधील माहितीचा अ‍ॅक्सेस वापरण्याची परवानगी देतात.कोणत्याही गेम किंवा क्‍विझ किंवा आकर्षित करणार्‍या कोणत्याही पेजला लाईक करू नका

Tags : Kolhapur, Kolhapur News, Facebook, controversy, data leak