होमपेज › Kolhapur › एफआरपीची पुनर्रचना होऊ देणार नाही : शेट्टी

एफआरपीची पुनर्रचना होऊ देणार नाही : शेट्टी

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 1:15AMकोल्हापूर ः प्रतिनिधी 

येत्या हंगामात उसाची एफआरपी पहिल्या साडेनऊ रिकव्हरीला 2,750 रुपये, तर त्यापुढील प्रत्येक टक्क्याला 289 रुपये निश्‍चित झाली आहे. दोन दिवसांपूर्वी शेतकरी नसलेल्यांशी संवाद साधून काही कारखान्यांना ही एफआरपी परवडत नाही हे कारण सांगून साडेनऊऐवजी दहा टक्के रिकव्हरी करण्याचा घाट सरकारचा असून, त्यातून शेतकर्‍याला प्रतिटन 190 रुपयांचा तोटा होणार आहे. एफआरपीच्या या पुनर्रचनेला आपला तीव्र विरोध असल्याचे खा. राजू शेट्टी यांनी सांगितले. 

स्वीस बँकेत काळा पैसा असतो, असे यापूर्वी ऐकले होते. तो आणला तर देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करणार, असे सांगितले होते; पण अलीकडेच हा पैसा पांढरा असल्याचा शोध अर्थमंत्री अरुण जेटली यांना लागला आहे, हा पैसा काळा असल्याचे सांगून जनतेला फसवणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी व जेटली यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. शेट्टी यांनी केली.

ते म्हणाले, मोदींच्या बैठकीला बोगस शेतकर्‍यांना बोलावले, त्यांना प्रश्‍न विचारता येणार नाहीत, त्यांनी बोलायचे नाही फक्त ऐकायचे, अशा अटी घातल्या गेल्या. मोदींच्या घरी नाश्ता, तर केंद्रीय मंत्री सत्यपालसिंह यांच्या घरी या शेतकर्‍यांना जेवण दिले. अशा बोगस शेतकर्‍यांशी चर्चा करून एफआरपीची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न झाल्यास ऊस उत्पादक पट्ट्यात औषधालाही कमळ किंवा भाजप शेतकरी शिल्लक ठेवणार नाही.

वाढीव एफआरपीमुळे कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये जात असतील, तर ते कारखानदारांनी बघून घ्यावे, असा टोला खा. शेट्टी यांनी आ. हसन मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्यावर  लगावला. सरकारच्या प्रयत्नामुळे साखरेचे भाव प्रतिक्विंटल 2,900 रुपये निश्‍चित झाले, आता हे भाव 3 हजारांपुढे आहेत. कारखानदारांनीही आता उर्वरित देणी प्रामाणिकपणे द्यावीत. यासंदर्भात कारखानदार रस्त्यावर उतरणार असतील, तर आम्हीही त्यांच्यासोबत असू, असे शेट्टी म्हणाले.

राजीनामा ठरल्याप्रमाणेच

कमळ औषधाला शिल्लक ठेवणार नाही याची सुरुवात जिल्हा परिषदेतून करणार का, या प्रश्‍नावर बोलताना शेट्टी यांनी, सभापतींचा राजीनामा हा ठरल्याप्रमाणे दिला आहे. आमच्यासोबत असलेल्या दुसर्‍या आघाडीला हे पद मिळणार आहे. यापूर्वी आम्ही काँग्रेसविरोधात लढूनही त्यांच्यासोबत पाच वर्षे राहिलो. त्यामुळे साटेलोटे वगैर काही नाही, असे सांगत सत्तेतून बाहेर न पडण्याचेच संकेत शेट्टी यांनी दिले.