Sun, Oct 20, 2019 01:55होमपेज › Kolhapur › एफआरपी चुकीच्या आकडेवारीवर!

एफआरपी चुकीच्या आकडेवारीवर!

Published On: May 27 2018 1:10AM | Last Updated: May 27 2018 1:08AMकुडित्रे : प्रा. एम. टी. शेलार 

1970 पासून चालत आलेल्या एस.एम.पी.चे (2009 पासून एफ.आर.पी.) सूत्र बदलल्यामुळे कृषी मूल्य आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष टी. हक्क आणि केंद्रीय कृषी खाते यांच्यात जुंपली होती. त्यातून त्यांनी राजीनामा  दिला होता. त्यांनीच 2007 मध्ये सी.ए.सी.पी.मार्फत हैदराबाद येथे आयोजित शेतकर्‍यांच्या राष्ट्रीय अधिवेशनात एस.एम.पी. ठरवण्यात त्रुटी असल्याचे मान्य केले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर 22 ऑक्टोबर 2009 पासून एस.एम.पी.ची एफ.आर.पी. झाली. आता त्यांच्याच तरतुदींना सुरुंग लावण्याचे काम सुरू आहे. 

टी. हक्क यांच्या मते, एफ.आर.पी. ठरवण्यात खूप त्रुटी आहेत. या त्रुटी राज्य शासन गोळा करत असलेल्या उत्पादन खर्चाच्या माहितीबद्दल आहेत. जमिनीचा खंड, घसारा, शेतमजुरांचे पगार, याबाबतची माहिती अपुरी व चुकीची असते. शिवाय, उसाचा उत्पादन खर्च ठरवताना व्यवस्थापन खर्च, जोखीम यांचा विचारच होत नाही. 

71 टक्के शेतकरी आधारभूत किमतीबाबत अनभिज्ञ

नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनने केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, 71 टक्के शेतकरी किमान आधारभूत किमतीबाबत अनभिज्ञ आहेत. उर्वरित 29 टक्के शेतकर्‍यांपैकी 10 टक्के शेतकर्‍यांना ही संकल्पना माहीत आहे; पण तिचा लाभ घेण्यासाठी कोणत्या यंत्रणेकडे जायचे माहिती नाही. केवळ 19 टक्के शेतकरीच याच्याशी परिचित आहेत. याचा फायदा राज्यकर्त्यांनी व साखर कारखानदारांनी घेतला. आजपर्यंत एकाही कारखान्याने एफ.आर.पी.चे तंतोतंत पालन केले नाही. काहीनी एफ.आर.पी. दिली; पण तुकडे पाडून आणि जमेल तेव्हा त्यात सूत्र बदल करून कोलदांडा घातला. पहिला कोलदांडा 2004-05 च्या हंगामात अ‍ॅव्हरेज पीक रिकव्हरीऐवजी अ‍ॅव्हरेज रिकव्हरी पायाभूत मानून व 8.5 टक्के पायाभूत उतारा 9 टक्के करून घातला. तर 2009-10 च्या हंगामात पायाभूत उतारा 9.5 टक्के करून दुुसरा धक्का दिला. पुढे 22 ऑक्टोबर 2009 रोजी शुगरकेन (कंट्रोेल) ऑर्डर 1966 मध्ये सुधारणा करून एस.एम.पी.ची एफ.आर.पी. केली. नाव बदलले व अन्याय सुरूच आहे. आता ती अडचणीची वाटू लागल्यावर त्यात सुधारणा करण्याचा डाव घाटतोय.     

( क्रमशः)