Wed, May 22, 2019 22:41होमपेज › Kolhapur › ‘एफआरपी’चे सूत्रच बदलण्याचा घाट!

‘एफआरपी’चे सूत्रच बदलण्याचा घाट!

Published On: May 25 2018 1:09AM | Last Updated: May 24 2018 10:23PMकुडित्रे : प्रा. एम. टी. शेलार

सरकार आणि कारखानदार यांनी मिलीभगत करीत प्रतिकूल वाटणारे एफ.आर.पी.चे (पूर्वाश्रमीची एस.एम.पी.) सूत्र बदल करून अनुकूल करून घेतले, पण आता अंगलट आल्याने एफ.आर.पी. चा दर अवास्तव असल्याची ओरड करीत भारतीय साखर कारखानदारांची संघटना असलेल्या  इस्माने एफ.आर.पी. निश्‍चित करण्याची पद्धतीच बदलण्याची मागणी केल्याने ऊस उत्पादक संतप्त झाले आहेत.
2005-06 च्या हंगामापासून तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यानी एफ.आर.पी. च्या सूत्रात महत्त्वाचे तीन घातक बदल करून ऊस उत्पादकांच्या मार्गात काटे पसरले. 1980-81 पासून चालत आलेल्या सूत्रास तिलांजली दिली. यातील पहिला बदल म्हणजे एफ.आर.पी. (पूर्वी एस.एम.पी.) काढताना त्या कारखान्याचा गेल्या हंगामातील अ‍ॅव्हरेज पीक रिकव्हरी पाया मानला जात असे. तो बदलून केंद्र सरकारने गेल्या हंगामातील अ‍ॅव्हरेज रिकव्हरी पाया मारण्याचे सूत्र स्वीकारले. प्रतिटन 350 रुपयांनी एफ.आर.पी. मारली!

अ‍ॅव्हरेज पीक रिकव्हरी  म्हणजे कारखान्यांच्या गळीत हंगामातील  जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांच्या उतार्‍यांची सरासरी. अ‍ॅव्हरेज रिकव्हरी  म्हणजे कारखान्याच्या संपूर्ण गळीत हंगामाची सरासरी रिकव्हरी. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांत थंडीमुळे साखर उतारा अत्यंत चांगला असल्याने अ‍ॅव्हरेज रिकव्हरीपेक्षा अ‍ॅव्हरेज पीक रिकव्हरी ही एक ते दीड टक्‍का जास्त असते. हा पायाच बदलल्याने ऊस उत्पादकांची एफ.आर.पी. दीड टक्क्याने घटली. चालू दराने म्हणजे 2017-18 च्या हंगामात प्रतिटन 402 रुपयांनी ऊस दर घटला, तर कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार पुढील हंगामात तो दर प्रतिटन 433 रुपयांनी घटणार आहे.