Tue, Jul 16, 2019 01:52होमपेज › Kolhapur › साखर दर घसरणीनंतरही ‘सह्याद्री’ची 2,921 उचल

साखर दर घसरणीनंतरही ‘सह्याद्री’ची 2,921 उचल

Published On: Mar 13 2018 1:42AM | Last Updated: Mar 12 2018 10:38PMहमीदवाडा : मधुकर भोसले

यंदाचा गळीत हंगाम सुरू होताना जे साखरेचे दर होते, ते गळीत हंगाम निम्मा झाल्यानंतर टिकले नाहीत, हे वास्तव आहे व त्यामुळेच शेतकरी संघटना किंवा शेतकरी यांच्याशिवाय साखर कारखानदारांनी जिल्हा बँकेत बैठक घेऊन जाहीर केलेला दर देण्यास आम्ही बांधिल आहोत. मात्र, सध्या अडचणीच्या काळात 2,500 रुपयांचाच भरणा केला जाईल, असे जाहीर केले व त्याप्रमाणेच पुढील सर्व बिलेही जाहीर झालेल्या दरामध्ये 500 ते 600 रुपयांची कपात करून 2,500 रुपयांनीच दिली जात आहेत. या सार्‍या पार्श्‍वभूमीवर कराड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने मात्र आपल्या जाहीर 3,021 रुपये दरामध्ये फक्‍त 100 रुपयांची कपात करून 2,921 रुपयांप्रमाणे 28 फेब्रुवारीअखेरची सर्व बिले आदा केली आहेत. त्यामुळे अडचणीतील शेतकर्‍यांना चांगला हातभार लागला आहे. सहवीजनिर्मिती नसतानाही या कारखान्याने दाखवलेले हे आर्थिक धाडस जिल्ह्यातील कारखान्यांनी सहप्रकल्प असताना तरी दाखवावे, अशी मागणी होणे स्वाभाविक आहे. 

ऊस उत्पादनाचा कमालीचा वाढत जाणारा खर्च पाहता शेतकर्‍याला एकरकमी अधिक रक्‍कम मिळणे आवश्यक आहे. यंदा हंगामाच्या प्रारंभी ऊसटंचाईची शक्यता गृहीत धरून निघालेल्या ‘एफआरपी’ अधिक दोनशे रुपये या तोडग्याच्याही पुढे जात कारखान्यांनी दर जाहीर केले. हे दर प्रतिटनास 3,100 रुपयांपर्यंत पोहोचले. सुरुवातीची एक महिन्याची बिले अनेक कारखान्यांनी या पूर्ण जाहीर रकमेएवढी भरणा केली. मात्र, नंतर साखर दर 3,400 ते 3,500 वरून 2,900 रुपयांवर पोहोचल्यावर कारखाने अस्वस्थ झाले. खरेतर यावर्षी मागणी व आंदोलन न करताही ठरलेल्या तोडग्यापेक्षा जादा दर जाहीर झाल्याने शेतकरीही खुशीत होता. अर्थात, यामागे ऊस उपलब्धता हे कारण होते. मात्र, साखर दर घसरणीनंतर जाहीर दरामध्ये कपात करून 2,500 रुपयांप्रमाणे भरणा केला जात आहे. 

कराडपासून दहा कि.मी. अंतरावरील यशवंतनगर येथील सह्याद्री साखर कारखाना हा महाराष्ट्राचे शिल्पकार, थोर नेते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने निर्माण झाला आहे. तत्कालीन आ. पी. डी. पाटील हे संस्थापक आहेत व त्यांचेच सुपुत्र आ. बाळासाहेब पाटील हे या कारखान्याचे सध्या अध्यक्ष आहेत. प्रतिवर्षी सुमारे 12 ते 13 लाख टन ऊस गाळपाची या कारखान्याची परंपरा आहे. यावर्षी आतापर्यंत 12.18 साखर उतार्‍याने 10 लाख टन ऊस गाळप केले आहे. पाच तालुक्याचे या कारखान्याचे कार्यक्षेत्र असून, 42 हजार सभासद आहेत. 1974 ला पहिला गळीत हंगाम घेणार्‍या या कारखान्याने ऊस दराच्या बाबतीत नेहमीच आघाडी ठेवली आहे. इतकेच नव्हे, तर गतवर्षीदेखील पश्‍चिम महाराष्ट्रात गळीत हंगाम संपल्यानंतर दुसरी उचल देण्यामध्ये हाच कारखाना आघाडीवर होता.

गेल्या काही वर्षांमध्ये एफआरपी व त्यापेक्षाही अधिक दर देण्यामध्ये काहीवेळा अन्य कारखाने किंवा राजकीय नाराजी स्वीकारूनदेखील आ. पाटील यांनी खंबीर राहत जाहीर केलेले दर एकरकमी देण्यासाठी उचललेले पाऊल शेतकर्‍यांना मात्र दिलासादायक ठरले आहे.