Mon, Jun 17, 2019 14:14होमपेज › Kolhapur › टोकाचे आंदोलन हाच पर्याय

टोकाचे आंदोलन हाच पर्याय

Published On: Apr 17 2018 1:53AM | Last Updated: Apr 17 2018 1:34AMकोल्हापूर : प्रतिनिधी

लिंगायत धर्म मान्यता आणि आरक्षणाबाबत सरकारकडून सुरू असलेली चालढकल सहनशीलतेपलीकडे गेली असून, आता टोकाचे आंदोलन हाच पर्याय उरला असल्याचे लिंगायत संघर्ष समितीच्या कार्याध्यक्षा सौ. सरलाताई पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. जूनपर्यंत निर्णय न झाल्यास नऊ ऑगस्टपासून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर धरणे आंदोलन आणि 15 ऑगस्टला राष्ट्रध्वजाबरोबरच लिंगायत धर्माचा ध्वज फडकावला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लिंगायत धर्माला मान्यता, अल्पसंख्याकांचा दर्जा, पोटजातींना ओबीसी आरक्षण मिळावे, या मागण्यांसाठी संघर्ष समितीच्या वतीने 2014 ला आझाद मैदानावर धरणे आंदोलन केल्यानंतर नऊ ऑगस्ट 2014 ला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर कराड येथे बेमुदत उपोषण करण्यात आले होते. त्याचवेळी तत्कालीन पाणीपुरवठामंत्री दिलीप सोपल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दिलेल्या अहवालानुसार 28 जून 2014 रोजी लिंगायत धर्माला मान्यता आणि अल्पसंख्याक दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. हा ठराव अद्याप केंद्र सरकारकडे गेला नाही. तो पाठविण्यासाठी संघर्ष समितीच्या वतीने मोर्चे काढण्यात आले; पण उपयोग झाला नसल्याचे सौ. पाटील यांनी सांगितले.

लिंगायत संघर्ष समितीच्या आंदोलनात ढवळाढवळ करण्याचा अधिकार काडसिद्धेश्‍वर महाराजांना नाही, असे यावेळी विजय शेटे यांनी सांगितले. ते म्हणाले की, काडसिद्धेश्‍वर महाराजांबद्दल आदर आहे; पण लिंगायत धर्मगुरू दलितांच्या व गरिबांच्या घरी जात नाहीत, असा केलेला आरोप चुकीचा आहे. लिंगायत मठाधीशपदी अनेक ठिकाणी महिला धर्मगुरूही आहेत. लिंगायत धर्मात उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ ही संकल्पना नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आपण हिंदू-वैष्णव असल्याचे सांगतात; पण ते जैन आहेत असे यावेळी शेटे यांनी सांगितले. अमित शहा यांचा धर्म जैन असल्याबाबतचा कागदोपत्री पुरावा त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केला. यावेळी संघर्ष समितीचे काकासाहेब कोयटे, राजाभाऊ मुंढे, बाबुराव तारळे, अशोक माळी, शिवानंद हैबतपुरे, चंद्रशेखर बटकडली उपस्थित होते.

Tags : Kolhapur, Extreme, movement, only, option