Mon, Nov 19, 2018 18:58होमपेज › Kolhapur › प्लास्टिक बंदीला मुदतवाढ द्या

प्लास्टिक बंदीला मुदतवाढ द्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी प्लास्टिक पिशव्या वापरावर राज्य शासनाने बंदी घातली आहे. हा निर्णय अतिशय चांगला आहे; पण चुकीच्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी केली जात आहे. त्याचा मोठा फटका व्यापार्‍यांना बसणार आहे. तेव्हा सध्या व्यापार्‍यांकडे असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा संपवण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अंमलबजावणीतील त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार आहे, असे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.  व्यापार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारू नये, यासाठी सोमवारी (दि. 26) दुपारी बाराच्या सुमारास शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना भेटणार असल्याचे गांधी यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासनाने शुक्रवारपासून प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. यामुळे व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी व्यापारी, उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यालयात झाली. 

शासनाने निर्णय अत्यंत घाई गडबडीने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेत असताना, व्यापारी, उद्योजक, चेंबर ऑफ कॉमर्ससारख्या संस्थांचे पदाधिकार्‍यांना विश्‍वासात घेणे गरजेचे होते. पण, शासनाने कोणालाही विश्‍वासात न घेता एकतर्फी निर्णय घेऊन बंदी घातली आहे. इतकेच नव्हे, तर प्लास्टिकच्या पिशव्या वापरणार्‍या व्यापार्‍यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे व्यापार्‍यांवर संकट निर्माण झाले आहे.

यासंदर्भात चेंबरच्या वतीने शासन दरबारी कैफियत मांडून न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी अनेक व्यापार्‍यांनी यावेळी केली. गांधी म्हणाले, कोणताही विचार न करता प्लास्टिक वापरण्यासाठी आपण पुढे होतो. आता शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी आणल्याने व्यापार्‍यांना विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आपला आपणच पर्याय शोधला पाहिजे. चेंबरच्या वतीने मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री यांच्याशी चर्चा करून या बंदीतील जाचक अटी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. सोमवारी जिल्हाधिकार्‍यांना भेटून प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार्‍या व्यापार्‍यांवर कारवाई करू नका, अशी विनंती केली जाणार आहे. या बैठकीला चेंबरचे संचालक संजय शेटे, जयेश ओसवाल, राहुल नष्टे, विनोद वाधवा, पुरषोत्तम बेंडके आदी उपस्थित होते. 

 

Tags : kolhapur, kolhapur news, plastic ban, Extension, Lalit Gandhi


  •