Sun, Aug 25, 2019 19:04होमपेज › Kolhapur › निर्यात साखरेवरील अनुदान होणार दुप्पट

निर्यात साखरेवरील अनुदान होणार दुप्पट

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 26 2018 12:51AMकोल्हापूर : निवास चौगले

निर्यात होणार्‍या साखरेवर दिले जाणारे प्रतिटन गाळप अनुदान 55 रुपयांवरून 100 रुपये करण्याचा विचार केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू आहे. सोमवारी दिल्लीत यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या अधिकार्‍यांच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. बैठकीला राष्ट्रीय साखर संघाच्या पदाधिकार्‍यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. 

निर्यात साखरेला अनुदान दिल्याशिवाय कारखान्यांकडून साखर निर्यातीला चालना मिळणार नव्हती; पण गॅट करारामुळे निर्यात होणार्‍या साखरेला थेट अनुदान देता येत नाही. म्हणून साखर निर्यात करणार्‍या कारखान्यांना त्यांनी केलेल्या गाळपाला प्रतिटन 55 रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला. यातून कारखान्यांना प्रतिक्विंटल साखरेला 5,500 रुपये मिळणार होते; पण हे अनुदान कमी असून, ते वाढवून शंभर रुपये करावे, अशी मागणी या उद्योगाकडून सातत्याने होत होती. त्यावर विचार करण्यासाठी आज दिल्लीत बैठक झाली. 

आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेची मागणी ठप्प आहे. देशातून 20 लाख टन साखर निर्यात करावी लागणार आहे. साखर निर्यातीचा कारखानानिहाय ठरवून दिलेला कोठा सप्टेंबर 2018 मध्ये संपवायचा आहे; पण मागणी नाही आणि अनुदानही कमी असल्याने बहुंताशी कारखान्यांकडून निर्यातीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे आढळून आले आहे. साखर निर्यातीला पुन्हा प्रोत्साहन म्हणून व या उद्योगाची मागणी म्हणून हे अनुदान वाढवण्याचा विचार सरकारसमोर आहे. हे अनुदान प्रतिटन गाळपास 100 रुपये केल्यास कारखान्यांना 1000 ते 1100 रुपये एफआरपीसाठी जादा मिळणार आहेत. 
याशिवाय आजच्या दिल्लीतील बैठकीत पुढील हंगामातील साखरेचे उत्पादन, निर्यातीसाठीच्या उपाययोजना यावरही चर्चा करण्यात आली. यावर्षीचा बफर स्टॉक निश्‍चित आहे; पण ठरल्याप्रमाणे साखर कारखान्यांनी साखर निर्यात केली का नाही, यावर जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचे या बैठकीत ठरले.