Thu, Jul 18, 2019 21:38होमपेज › Kolhapur › मनपाच्या घरफाळा सवलत  योजनेला हवी मुदतवाढ!

मनपाच्या घरफाळा सवलत  योजनेला हवी मुदतवाढ!

Published On: Jun 30 2018 1:16AM | Last Updated: Jun 29 2018 11:28PMकोल्हापूर : विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर महानगरपालिकेने शहरातील मिळकतधारकांना 30 जूनपूर्वी घरफाळा भरल्यास 6 टक्क्यांची सूट देण्याचा निर्णय घेतला असला, तरी प्रत्यक्षात प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अनेक मिळकतधारकांना त्यांच्या घरफाळ्याची बिलेच मिळाली नाहीत, अशी स्थिती आहे. यामुळे सवलतीचा लाभ घेण्याची अनेक मिळकतधारकांची इच्छा असूनही त्यांना सवलतीचा लाभ घेता येत नाहीत.  महापालिकेने या सवलत योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे. 

शहरामध्ये सुमारे 1 लाख 43 हजारांवर मिळकती आहेत. या मिळकतींच्या माध्यमातून महापालिकेला सुमारे 60 कोटी रुपयांची रक्‍कम घरफाळ्याच्या रुपाने मिळणे अपेक्षित आहे. ही रक्‍कम महापालिकेला योग्य वेळी मिळावी, नागरिकांची थकबाकी वाढून त्यावर व्याजाचा भुर्दंड बसू नये, यासाठी महापालिकेने सवलतीची योजना जाहीर केली.  यानुसार 30 जूनपूर्वी रक्‍कम भरल्यास 6 टक्के सूट देण्याचे निश्‍चित केले आहे. महा पालिकेच्या नागरी सुविधा केंद्रावर शेवटचे दोन दिवस असल्याने लांबलचक रांगा लागल्या आहेत. या योजनेला आणखी काही दिवसांची मुदत वाढवून दिली तर पालिकेच्या तिजोरीतच अधिक रक्‍कम जमा होऊ शकते.

याविषयी महापालिकेचे करनिर्धारक व संग्राहक दिवाकर कारंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नागरिकांनी आपला घरफाळा भरण्यासाठी पोस्टाने येणार्‍या बिलाची वाट पाहू नये, असे मत व्यक्‍त केले. घरफाळा सुलभ रितीने भरता यावा यासाठी महापालिकेने मोबाईल अ‍ॅप विकसित करून दिले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून मिळकतधारकाचे नाव अथवा ग्राहक क्रमांंक टाकल्यास घरफाळ्याची अद्ययावत माहिती उपलब्ध होत असल्याने या अ‍ॅपचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. या अ‍ॅपखेरीज अ‍ॅक्सिस बँकेतून घरफाळा ऑनलाईन भरण्याची सुविधाही उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. तथापि, शहरातील नागरिकांचा मोबाईल अ‍ॅपचा अत्यल्प वापर, ऑनलाईन पेमेंट भरण्याविषयीच्या साक्षरतेचे अभाव, घरफाळ्याच्या नव्या बिलांची अनुप्लब्धता आणि नागरी सुविधा केंद्रांबाहेर लागलेल्या रांगा यांची दखल घेऊन प्रशासनाने त्याला थोडी मुदतवाढ दिली तर अधिक रक्‍कम जमा होऊन महापालिकेचाच लाभ होऊ शकतो.