Sun, Jul 21, 2019 07:47होमपेज › Kolhapur › कोल्हापूर विमानतळ धावपट्टीचे विस्तारीकरण लवकरच

कोल्हापूर विमानतळ धावपट्टीचे विस्तारीकरण लवकरच

Published On: May 22 2018 1:25AM | Last Updated: May 22 2018 12:26AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या कामासह अन्य कामांची 80 कोटी 14 लाख रुपयांच्या कामांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निविदा 1 जून रोजी उघडण्यात येणार असून, त्यानंतर 18 महिन्यांत हे काम पूर्ण करावे लागणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे. धावपट्टीचे विस्तारीकरण झाल्यानंतर मोठी विमाने कोल्हापूर विमानतळावर उतरणार आहेत.

विमानतळ विस्तारीकरणासाठी प्राधिकरणाने 274 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे. यापैकी 30 टक्के रक्‍कम राज्य शासनाने दिली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिल्याने विस्तारीकरणाला वेग आल्याचे त्यांनी सांगितले. नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांना भेटून विमानतळ विस्तारीकरण काम जलद गतीने व्हावे, अशी आग्रही मागणी केली होती.

त्यावर प्रभू यांच्या सूचनेनुसार ही निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. धावपट्टी विस्तारीकरण, टॅक्सी वे, धावपट्टीची सुधारणा, विमानाच्या पार्किंगसाठी आयसोलेशन बे, रन वे एक्स्टेंशन सरफेस एरिया, ग्राऊंड सपोर्ट इक्‍विपमेंट एरिया तसेच या सर्वांशी निगडित सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल कामे यांचा प्रामुख्याने समावेश असलेल्या 80 कोटी 14 लाखांची ही निविदा असून विमानतळ प्राधिकरणाच्या पॅनेलवर असणार्‍या तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कंपन्यांसाठीच या निविदा मर्यादित आहेत. या निविदा 1 जून रोजी उघडण्यात येणार असून, 18 महिन्यांमध्ये ही सर्व कामे पूर्ण केली जाणार आहेत. 

सध्याची 1370 मीटर लांबीची धावपट्टी 930 मीटरने वाढवून ती एकूण 2300 मीटर इतकी केली जाणार आहे. मोठी धावपट्टी, टॅक्सी वे आणि आयसोलेशन बे या सुविधांमुळे काम पूर्ण झाल्यानंतर विमानतळावर 180 सीटर बोईंग विमानही उतरू शकणार आहे. येत्या दीड महिन्यात टर्मिनल बिल्डिंग, एटीसी टॉवर, गाड्या पार्किंग करण्याची व्यवस्था आणि इतर सुविधांबाबत स्वतंत्र निविदा प्रसिद्ध होणार आहे. विमानतळावर तात्पुरते तिकीट काऊंटर सुरू करावे आणि प्रतीक्षा कक्षाची क्षमता वाढवावी, अशी मागणी प्रभू यांच्याकडे केली होती.

त्यावर तिकीट कक्ष तत्काळ सुरू करण्यास प्रभू यांनी परवानगी दिली आहे.  सध्या एअर डेक्‍कनची सेवा नियमित सुरू असून, उडाण - फेज टूअंतर्गत इंडिगो एअरलाईन्सने कोल्हापूर-हैद्राबाद आणि कोल्हापूर-तिरुपती या मार्गांवर हवाई सेवा सुरू करण्यास अनुकूलता दर्शविली आहे. तसेच अलायन्स एअरने कोल्हापूर-बेंगलोर सेवा सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आहे. येत्या 3 महिन्यांत या दोन्ही मार्गांवर हवाई सेवा सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.