होमपेज › Kolhapur › कळंबा कारागृहाचे लवकरच विस्तारीकरण

कळंबा कारागृहाचे लवकरच विस्तारीकरण

Published On: Sep 02 2018 1:12AM | Last Updated: Sep 02 2018 12:25AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर येथील मध्यवर्ती कळंबा कारागृह विस्तारीकरणाचा गृह खात्याकडे प्रस्ताव दाखल झाला आहे. याबाबत लवकरच निर्णय शक्य आहे, असे मध्यवर्ती कारागृहाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले. पिंपरी-चिंचवड आणि नवी मुंबईसाठी नव्या कारागृहाचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असेही ते म्हणाले.

विशेष पोलिस महानिरीक्षक जाधव शनिवारी कोल्हापूर दौर्‍यावर आले होते. कळंबा कारागृहास भेट देऊन पाहणी केली. पत्रकारांशी बोलताना म्हणाले, पुणे येथील येरवडा कारागृहानंतर कोल्हापूरचे कळंबा कारागृह सुरक्षिततेच्या द‍ृष्टीने भक्‍कम, बंदिस्त असल्याने देश-विदेशातील कैदी मोठ्या संख्येने कारागृहात कारवास भोगत आहेत. 

 कैद्यांची सद्यस्थितीतील संख्या आणि एकूण क्षमता, सोयीसुविधांचा विचार केल्यास त्याचा प्रशासनावर ताण पडतो आहे. राज्यातील अन्य काही कारागृहांच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव कारागृह प्रशासनाकडे यापूर्वीच दाखल झाला आहे. वरिष्ठस्तरावर प्रस्तावाच्या अनुषंगाने पाठपुरावा करण्यात येत आहे. कळंबा कारागृहाच्या विस्तारीकरणाबाबत लवकरच निर्णय शक्य आहे. भविष्यात कैद्यांना चांगल्या मूलभूत सुविधा उपलब्ध होतील.
राज्यात आणखी काही नवीन जिल्हा कारागृहांचा प्रस्ताव आहे. पिंपरी-चिंचवड व नवी मुंबई येथील नियोजित मध्यवर्ती कारागृहांचा समावेश आहे. राधाकृष्णन समितीमार्फत कारागृहांचा सर्व्हे अंतिम टप्प्यात आहे. समितीचा अहवाल उपलब्ध होताच नवीन दोन मध्यवर्ती कारागृहांच्या मंजुरीचा निर्णय होईल, असेही विशेष पोलिस महानिरीक्षकांनी स्पष्ट केले. कळंबा कारागृहातील शिस्त, आदेशाचा काटेकोर अंमल, नेटकेपणा लक्षात घेऊन कैदी पुनर्वसन योजनेंतर्गत काही महत्त्वाचे उपक्रम राबविण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे, असेही जाधव यांनी सांगितले. यावेळी कारागृह अधीक्षक शरद शेळके यांच्यासह कारागृहातील अधिकारी उपस्थित होते.