Tue, Apr 23, 2019 00:26होमपेज › Kolhapur › विमानसेवा विस्तारणार

विमानसेवा विस्तारणार

Published On: Jun 10 2018 1:48AM | Last Updated: Jun 09 2018 11:21PMकोल्हापूर : अनिल देशमुख

अनेक वर्षे रखडलेली कोल्हापूरची विमानसेवा विस्तारणार आहे. सप्टेंबरपर्यंत तीन नव्या मार्गांवर विमानसेवा सुरू होत आहे. विमानतळावर पाच विमानांचे पार्किंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे येत्या दोन-तीन वर्षांत कोल्हापूर देशाच्या हवाई नकाशावर ठळकपणे येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

274 कोटी रुपये खर्चून विमानतळाचा विस्तार केला जाणार आहे. 750 एकर जागेत कोल्हापूरचे विमानतळ विस्तारणार आहे. सध्या विमानतळाची धावपट्टी 1,345 मीटर लांब आहे. यामुळे केवळ एटीआर-72 इतक्या क्षमतेची विमाने या धावपट्टीवर उतरू शकतात. आता धावपट्टीचे विस्तारीकरण करण्यात येणार असून, ती 2,300 मीटर लांब केली जाणार आहे. या कामाची निविदाही काढण्यात आली आहे. येत्या दोन वर्षात हे काम पूर्ण केले जाणार आहे. धावपट्टी वाढवल्याने एअरबससारखी मोठी विमानेही या विमानतळावर उतरणार आहेत. धावपट्टी विस्तारानंतर नाईट लँडिंगचेही काम केले जाणार आहे.

विमानतळ विस्तारीकरणात पाच विमानांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे पुणे-मुंबईतील काही विमाने रात्री पार्किंगसाठी कोल्हापुरात येतील. ही विमाने पुन्हा सकाळी मार्गस्थ होतील. यामुळे पुणे-मुंबई मार्गावर रात्री आणि सकाळी अशी जादाची विमानसेवा उपलब्ध होऊ शकते, असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेंतर्गत सध्या कोल्हापूर-मुंबई मार्गावर आठवड्यातून तीनवेळा विमानसेवा आहे. ही विमानसेवा नियमित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या दोन-तीन महिन्यांत याबाबतचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. ‘उडान’च्या दुसर्‍या टप्प्यात इंडिगो कंपनी कोल्हापूर-तिरूपती आणि कोल्हापूर-हैदराबाद या मार्गावर, तर ‘अलायन्स एअर’ ही कंपनी कोल्हापूर-बंगळूर या मार्गावर विमानसेवा देणार आहे. कोल्हापूर-तिरूपती आणि कोल्हापूर-हैदराबाद या मार्गावरील विमानसेवा 20 जुलैपासून सुरू करण्याचे कंपनीने नियोजन केले आहे. कोल्हापूर विमानतळानेही त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. कंपनीसाठी तिकीट विक्री काऊंटर सुरू करण्यात येणार आहे. त्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. ऑगस्टअखेर कोल्हापूर-बंगळूर विमानसेवेला प्रारंभ होण्याची शक्यता आहे.