Sun, Jul 21, 2019 14:54
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › जुने कपडे द्या, ‘धन कचरा’ पुस्तक घ्या...

जुने कपडे द्या, ‘धन कचरा’ पुस्तक घ्या...

Published On: Feb 26 2018 1:15AM | Last Updated: Feb 25 2018 8:52PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

साडी, जीन्स, ओढणीसह जुने कपडे द्या आणि ‘धन कचरा’ पुस्तक घ्या, या निसर्ग मित्र संस्थेच्या कृतिशील पर्यावरणपूरक उपक्रमास नागरिकांतून भरघोस प्रतिसाद लाभत आहे. विज्ञान मास (फेब्रुवारी महिना) व शिवजयंतीनिमित्त (19 फेब्रुवारी) निमित्त आपली वसुंधरा स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी ‘कचर्‍यातून धननिर्मिती’ हे अनोखे प्रदर्शन व घरगुती कचरा व्यवस्थापन या विषयाची विशेष कार्यशाळा 1 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. संस्थेच्या साईक्स एक्स्टेंशन येथील दलित मित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालयात ही कार्यशाळा व प्रदर्शन सुरू असून याचा लाभ नागरिक आवर्जून घेत आहेत. 

प्रदर्शनात 25 कृतिशील प्रयोगांची मांडणी करण्यात आली आहे. या प्रदर्शनास भेट देणार्‍या पर्यावरणप्रेमी जागृत नागरिकांच्या आग्रहामुळे सहज व सोप्या प्रयोगांची माहिती देणारी पुस्तिका तयार करण्यात आली आहे. पुस्तिकेत घरगुती कचर्‍याचे वर्गीकरण, ‘घन कचरा’ नव्हे ‘धन कचरा’ व्यवस्थापन, निसर्गाचं देण पेटील, जेवणानंतर तयार होणार्‍या कचर्‍याचे बायोगॅस संचकाच्या सहाय्याने निर्गत, प्लास्टिक कचर्‍याला चोख पर्याय कापडी व कागदी पिशव्या, निर्माल्य व टाकाऊ पाना-फुलापासून रंग निर्मिती, सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्‍तिक स्वच्छता कचरा व्यवस्थापन, कचरा निर्मिती करण्यांची कर्तव्ये, कायदे आणि ‘लक्षात ठेवा’ या सदरात दैनंदिन जीवनात निर्माण होणार्‍या कचर्‍याचे वैज्ञानिक पर्याय अशा इत्थंभूत माहितीचा समावेश आहे. यामुळे ही पुस्तिका कचरा व्यवस्थापनासाठी अत्यंत उपयुक्‍त ठरत असल्याचे नागरिकांतून सांगण्यात आले. 

प्रा. विकास काशीद, प्रा. उमाकांत आवटे, सलिम बैरागदार यांच्या सहकार्याने या पुस्तिकेची निर्मिती करण्यात आली आहे. दरम्यान, पुस्तिकेचे प्रकाशन घरगुती कचर्‍याचे यशस्वीरीत्या व्यवस्थापन करणार्‍या प्रमिला परशुराम डोईफोडे, शैलजा चंद्रकांत आवटे, विना पराग केमकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अरविंद केमकर होते. संयोजन निसर्ग मित्र संस्थेचे कार्यवाह अनिल चैागुले, पराग केमकर, अभय कोटणीस, आदर्श सहेली मंचच्या राणिता चौगुले, भारत चौगुले, यश चौगुले, अनिल चौगुले, प्रतिमा काशीद आदींनी केले.

शिवछत्रपतींचे आज्ञापत्र

छत्रपती शिवाजी महाराज यांनी दूरद‍ृष्टीने पर्यावरणाचीही आवर्जून काळजी घेतली. प्रत्येक सजीवासाठी आवश्यक असणार्‍या पर्यावरणाच्या जतन-संवर्धन आणि संरक्षणासाठी विशेष उपाय-योजना केल्या. पाणी व कचरा व्यवस्थापनाबाबत सूचना देणारी आज्ञापत्रे काढली. यामुळेच आज 400 वर्षांनंतरही शिवछत्रपतींच्या दूरद‍ृष्टीमुळे राज्यभर विखुरलेल्या गडकोट-किल्ल्यांवरील टाक्या-विहिरी-कुंडात भरघोस पाणीसाठा आहे. त्यांच्या या कार्याची माहिती भावी पिढीला व्हावी यासाठी शिवरायांचे कचरा विषयक आज्ञापत्राचा समावेशही पुस्तिकेत केला आहे.