Wed, Mar 27, 2019 01:59होमपेज › Kolhapur › चला तर मग, एक-एक पाऊल उचलू या!

चला तर मग, एक-एक पाऊल उचलू या!

Published On: May 22 2018 1:25AM | Last Updated: May 22 2018 12:01AMकोल्हापूर : विजय पाटील 

रस्त्यांवरील वाहनांचे पार्किंग कमी करावयाचे  असेल तर आता मल्टीलेव्हल पार्किंगला पर्याय नाही. वाहतुकीची वर्दळ नको असेल तर बस, रिक्षा आदी सार्वजनिक वाहतूक सोयीनियुक्‍त आणि दर्जेदार करायला हवी. अवजड वाहनांमुळे होणारा ताकतुंबा  हटवायचा असेल तर रिंगरोड आणि महामार्गाशी कनेक्ट होणारे रस्ते रुंद झाले पाहिजेत. हे सध्याचे वाहतूक नियमनाच्या बाबतीतले प्रभावी मार्ग आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाने वाहतुकीची शिस्त पाळलीच पाहिजे, यासाठी कायदेशीर कारवाई कडक करायला हवी. या गोष्टींसाठी चला तर मग, एक-एक पाऊल उचलू या आणि अपघात, दुर्घटना आणि कोंडी संपवू या!

शहरातील वाहतूक आगामी काळात प्रचंड वाढतच राहणार आहे. कारण कोल्हापूर हे देश-विदेशी लोकांच्या पर्यटनाचे आकर्षण बनत आहे.  याचा अर्थ सध्या दिसणार्‍या वाहतुकीच्या समस्या अधिक भीषण होतील. त्यामुळे प्रत्येक गोष्टींबाबत आता प्रशासनाने अंमलबजावणी केली पाहिजे. कारण ज्यावेळी काहीतरी मोठा अनर्थ घडतो, त्यानंतरच सगळ्या यंत्रणा खडबडून जाग्या होतात, हे आपल्याकडचे चित्र असते.  पण असे काही घडूच नये म्हणून खबरदारी घेण्यात यंत्रणा सपशेल मागे दिसते.  प्रशासन नावाच्या अधिकारसंपन्न यंत्रणेने पुर्वनियोजन करणे हे अपेक्षित आहे. या गोष्टी कोल्हापूरबाबत तातडीने अंमलात आणाव्या लागतील.  शहरातील वाहतुकीबाबत त्यामुळं नियोजन आणि अंमलबजावणी जलद केली तरच भविष्यातील समस्यांचे रुपांतर संधीत होऊ शकेल.
 

हे झाले तर समस्या बनतील संधी 

1)  शहरात मध्यवर्ती बसस्थानक (सीबीएस),   बिंदू चौक,  एसटी स्टँड, सरस्वती टॉकीज,  रंकाळा,  दसरा चौक परिसरात मल्टीलेव्हल पार्किंगची सोय करण्याची गरज आहे. कारण या ठिकाणी सर्वाधिक वाहनांची संख्या असते. तसेच हे रस्ते शहराशी थेट कनेक्टेड असल्याने येथे पार्किंगची सुविधा अत्यावश्यक आहे. 

2)  सार्वजनिक वाहतुकीचा (उदा. बस, टॅक्सी, रिक्षा)  वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहनपर आणि कल्पक उपक्रम राबवायला हवेत. या वाहनांमध्ये सर्व सुविधा निर्माण करायला हव्यात. युरोपमध्ये सर्वात जास्त प्रवास हा सार्वजनिक वाहतुकीने केला जातो. त्यामुळे या ठिकाणी अपवाद वगळता वाहतूकीची कोंडी दिसत नाही. तसेच अनेक देशांत पार्किंग रस्त्यांवर करू दिले जात नाही. तसेच पार्किंगचे दरही जाणीवपूर्वक जास्त ठेवले आहेत. त्यामुळे लोक जवळ जायचे असेल तर स्वत:च्या वाहनांऐवजी  सार्वजनिक वाहतूकीचा सहकुटुंब वापर करताना दिसतात. 

3)  उपनगरातून अनेक रिंगरोड प्रस्तावित आहेत. हे रिंगरोड शहराबाहेरील मुख्य मार्गांना जोडले जाणार आहेत. त्यामुळे रिंगरोड झाले तर शहरात येणारी किमान तीस टक्के वाहतूक वळू शकणार आहे. त्यामुळे रिंग रोडची कामे त्वरित करायला हवीत. 

4) पुणे-बंगळूर, रत्नागिरी-कोल्हापूर या प्रमुख महामार्गांशी पाचगाव-गिरगाव, कंदलगाव-कणेरी, कसबा बावडा-वडणगे, कसबा बावडा-शिये आदी रस्ते कनेक्टेड आहेत. हे मार्ग सध्या अरुंद आहेत. तसेच यातील अनेक  मार्गांवर अतिक्रमणे झाली आहेत. या मार्गावरील नागरीकांनीही यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. कारण रस्ता रुंदीकरण झाला तर सबंधित परिसराचे अर्थकारण वेगाने वाढेल. 

5)लक्षवेधी मुद्दा म्हणजे शहराच्या मध्यभागी असणारी सरकारी कार्यालयांत (उदा. करवीर तहसीलदार, करवीर, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा पोलिस ठाणे, महापालिका,  सिटी सर्व्हे आदी) मोठी वर्दळ असते. त्यामुळे या परिसरात वाहनांची सतत कोंडी दिसते. यासाठी या कार्यालयांचे विकेंद्रीकरण करून उपविभाग करायला हवेत.  दुसया बाजूला काही शोरुम्स, हॉटेल्स, दवाखाने यांचे स्वत:चे पार्किंग नाही. त्यामुळे अशांनी  काहीतरी उपाययोजना करायला हवी. 

विनाकारण कायद्याचा दंडुका नको 

एका कॉन्स्टेबलने महापालिकेच्या एका तरुण अधिकार्‍यास अडवून त्याच्याकडे लायसन्स मागितले. पण, सबंधित अधिकार्‍याने पाकीट चोरीला गेले असून, त्यामध्ये लायसन्सही होते, असे सांगून पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्याच्या एफआयआरची प्रत दाखवली. प्रत दाखवूनही सबंधित कॉन्स्टेबल तणतणच होता. या दोघांचा संवाद सुरू असताना तिब्बल शिट असणारी दुचाकी कॉन्स्टेबलला काय साहेब, अशी हाक मारून गेली. कॉन्स्टेबलनेही त्यांना काय नाही, असे म्हणत प्रतिसाद दिला. ओळखीच्यांना नियमांतून सुट्टी आणि नियम पाळणार्‍यांना विनाकारण कायद्याचा दंडुका दाखवण्याची ही वृत्तीही संपायला हवी.