Wed, Apr 24, 2019 19:33होमपेज › Kolhapur › सावधान....आजही होताहेत बालविवाह!

सावधान....आजही होताहेत बालविवाह!

Published On: Dec 02 2017 1:09AM | Last Updated: Dec 01 2017 11:50PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रिया सरीकर

गेल्या काही वर्षांत बालविवाहाची प्रथा समुळ नष्ट झाल्याची परिस्थिती जाणवू लागली होती. पण वास्तव मात्र यापेक्षा खूप वेगळे दिसून आले आहे. लांब नाही तर कोल्हापूर जिल्ह्यात एप्रिलपासून नोव्हेंबर 2017 पर्यंत तब्बल 18 बालविवाह मोडीत काढण्यात येथील चाईल्ड लाईन संस्थेला यश आले आहे. पण अजूनही ही समस्या पूर्णत: टळलेली नाही. गेल्या आठवड्यात करवीर मधील 2 आणि पन्हाळा येथील 1 असे तीन बालविवाह रोखण्यात आले आहेत. ही परिस्थिती गंभीर बनत चालली आहे, कारण कोल्हापूर जिल्ह्यातील काही दुर्गम भागात आजही बालविवाह होताहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा आदी भागात बालविवाहाची प्रथा आजही कायम आहे. येथे वास्तव्यास असलेल्या गोपाळ, गोसावी, बहुरूपी, कांझारभाट समाजासह धनगरवाड्यांवर बालविवाह सर्रास होत आहेत. आर्थिक दुर्बलता, शिक्षणाचा आभाव, असुरक्षितता अशा एक ना अनेक कारणांनी या समाजातील नागरीक ग्रस्त असल्याने आजही जुन्या रूढी परंपरांनुसार जीवन व्यथीत करणे येथे पसंत केले जाते.

अगदी 12 ते 16- 17 वयातील मुलींचा विवाह लावून दिला जातो. अनेकदा मुलांचे वय देखील 21 पेक्षा कमी असल्याचे अढळून येते. गावातील एखाद्या व्यक्‍तीकडून बालविवाहाची माहिती मिळाली तरच विवाह रोखणे शक्य होते. गेली सात वर्षे चाईल्ड लाईन कोल्हापुरात कार्यरत आहे. चाईल्ड लाईनची मर्यादा कोल्हापूर शहर असूनही जिल्ह्यात त्यांचे काम सुरु आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 62 बालविवाह रोखण्यात संस्थेला यश आल्याचे चाईल्ड लाईनच्या केंद्र समन्वयक अनुजा खुरंदळ यांनी सांगीतले.     

असा रोखला जातो बालविवाह

चाईल्ड लाईनच्या 1098 या हेल्पलाईनवर बालविवाहाची माहिती द्या
संबंधित व्यक्‍तीचे नाव गुप्त ठेवून कारवाई केली जाते.
प्रथम पोलिसांना बालविवाहाची सूचना दिली जाते.
यानंतर गावच्या पोलिस पाटील, ग्रामसेवक, सरपंच यांना कळवले जाते
पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी जाऊन पालकांना समजावले जाते
मुलामुलीच्या जन्म दाखल्याच्या नोंदी तपासल्या जातात.
विवाह होण्यापूर्वी मुलगी कमी वयाची आढळल्यास कारवाई झाल्यास सूचना दिल्या जातात
विवाह झाल्यानंतर प्रकरण उघडकीस आले आणि मुलगी लहान असेल तर बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले जाते.