होमपेज › Kolhapur › राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाही तरीही लोकसभा लढवणारच : धैर्यशील माने

‘मला तिकीट देऊन न्याय द्यायचा की, अन्याय करायचा हे शरद पवारांनी ठरवावे’

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 1:41AMइचलकरंजी : वार्ताहर

आघाडीच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत माने गटावर अन्यायच होत आला आहे. त्यामुळे माने गटातील मरगळ झटकून पुनर्बांधणीसाठी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती माजी जि. प. उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी पक्षाकडून तिकीट देऊन न्याय द्यायचा की, अन्याय करायचा, हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच ठरवावे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यावर आपण ठाम असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. माने यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयाला माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांनीही यावेळी हिरवा कंदील दाखवला. 

शिवजयंतीनिमित्त येथील दलितमित्र काकासाहेब माने इचलकरंजी नगरपालिका नोकरांची को-ऑप. क्रेडिट सोसायटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राचे अनावरण माजी खासदार श्रीमती निवेदिता माने व धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी खासदार कै. बाळासाहेब माने यांनी संघर्ष करून अनेक निवडणुका जिंकल्या. त्यानंतर श्रीमती माने यांनाही मोठा संघर्ष करावा लागला. माने गटाला कोणतीही गोष्ट संघर्ष केल्याशिवाय मिळालेली नाही, असे सांगत मलाही आता संघर्ष करावा लागणार असल्याने त्यासाठीची तयारी केली आहे. गतवेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील जागा काँग्रेससाठी राष्ट्रवादीने सोडली होती. त्यावेळी पक्षाने आम्हाला आश्‍वासन दिले होते. मात्र, आजपर्यंत अन्यायच होत आला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस तिकीट द्यायचे की नाही याचा निर्णय घेईलच मात्र आपण लोकसभा निवडणूक लढवणारच असे माने यांनी यावेळी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर माने गटाच्या पुनर्बांधणीसाठी हातकणंगले तालुक्यातील 27 गावांचा दौरा पूर्ण केला आहे. गत 10  वर्षांत सत्तेत असो वा नसो, पक्षापासून बाजूला गेलो नाही. परंतु, आजवर पक्षाकडून आमच्यावर झालेल्या अन्यायाचे गार्‍हाणे पक्षश्रेष्ठी शरद पवार यांच्यासमोर मांडले आहे. त्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. पक्षाकडून उमेदवारी मिळो किंवा न मिळो रिंगणात उतरण्यावर ठाम आहे. हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील रत्नाप्पाण्णा कुंभार व बाळासाहेब माने गटाला पुन्हा एकजूट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये निश्‍चितपणे यश मिळेल, असे ते म्हणाले.

पुरणपोळी महागात पडली

गत दहा वर्षांपूर्वी श्रीमती निवेदिता माने लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार असताना आवाडेंच्या घरी जाऊन त्यांनी पुरणपोळीचा आस्वाद घेतला होता. याच अनुषंगाने विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देताना धैर्यशील माने यांनी आवाडेंच्या घरी जाऊन पुरणपोळी खाणे कार्यकर्त्यांना न रुचल्याने आम्हाला ती चांगलीच महागात पडली. साखर सम्राटांच्या विरोधात भूमिका घेणारे शेट्टी आज त्यांच्याशीच सलगी करीत आहेत. त्यामुळे पुरणपोळी जशी आम्हाला महागात पडली त्याचप्रमाणे ‘साखर’ही शेट्टी यांना यावेळी जागा दाखवून देईल, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

 

Tags : kolhapur, kolhapur news, Lok Sabha, Dhairyashil Mane,