Fri, Jul 19, 2019 01:30होमपेज › Kolhapur › बांबूपासून इथेनॉल!

बांबूपासून इथेनॉल!

Published On: Aug 24 2018 12:43AM | Last Updated: Aug 24 2018 12:20AMकुडित्रे  : प्रतिनिधी

आतापर्यंत मोलॅसिसपासून, उसाच्या थेट रसापासून, साखरेपासून इथेनॉल तयार होतो हे आपणास ठाऊक आहे. काही ठिकाणी मक्यापासून, सडलेल्या गव्हापासून, ज्वारीच्या थाटापासून ही इथेनॉल तयार करण्याचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. पण, हिमालयाच्या पायथ्याशी असणार्‍या दलदल असलेल्या आठ राज्यांमध्ये (जिथे बांबूच पीक उदंड येते) चक्क ‘बांबूपासून ‘इथेनॉल’ तयार करण्याचा नुमालीग्रह रिफायनरी आसाममध्ये 200 दशलक्ष डॉलरचा प्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पातून दरवर्षी 60 दशलक्ष लिटर्स इथेनॉल उत्पादन होणार आहे.

हिमालयाच्या पायथ्याशी असणार्‍या राज्यांना वरदान ईशान्येकडील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या अरुणाचल, सिक्कीम, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर व आसामचा कोपरा या आठ राज्यांत बांबूचे प्रचंड उत्पादन होते. दलदल आणि अनुकूल हवामान यामुळे बांबूचे पीक या प्रदेशांना नैसर्गिकवरदान आहे. या बांबूचे गाळप करून उत्पादित इथेनॉल ईशान्य भारताची इथेनॉलची गरज पूर्ण होणार आहे. 

200 दशलक्ष डॉलरचे जॉईंट व्हेंचर

नुमालीगृह रिफायनरीज लिमिटेड आणि फिनीश टेक्नॉलॉजी फर्म कम्पॉलीश ओय यांनी 200 दशलक्ष डॉलरचे जॉईंट व्हेंचर(संयुक्त उपक्रम) सुरू केले आहे. त्यांनी उसाप्रमाणे गवताच्या जातीत मोडणारे बांबू गाळून त्यापासून दरवर्षी 60 दशलक्ष लिटर इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प आसाममध्ये उभा केला आहे.

भारतीय तेल कंपन्या इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी बायोफ्यूएल रिफायनरीज वर संशोधनात व्यग्र आहेत. यातून कंपन्या बिगर मोलॅसिस (नॉन मोलॅसिस) स्रोतापासून इथेनॉल उत्पादन करण्याच्या प्रयत्नात आहेत. यामध्ये पिकांचे काढणीनंतर उरलेले अवशेष, पेट्रोकेमिकल्स याचा समावेश आहे; परंतु भारतात पर्यायी जैव आणि पर्यायी इंधनाचा वापर अतिशय अल्प आहे. पेट्रोल आणि डिझेल मध्ये 5 टक्के मिसळण्याचे उद्दिष्ट आहे, पण केवळ 2.1 टक्केच मिश्रणाचे उद्दिष्टच पूर्ण करू शकलो आहोत.

भारतातील एका राज्यामार्फत चालवल्या जाणार्‍या एका रिफायनीजचे मॅनेजिंग डायरेक्टर एस.के.बरुआच्या मते भारतीय ‘बांबू’ या बाबतीत महत्त्वाची भूमिका पार पाडू शकेल. त्यामुळे भारताची इंधन सुरक्षितता व हरित इंधन यासाठी बांबू उपयोगी ठरेल, असा विश्‍वास बरुआ यांनी व्यक्त केला. हा आमचा पहिला प्रयोग असला तरी हा प्रकल्प गुंतागुंतीचा नाही, असे ते म्हणाले.

2022 पर्यंत इंधन आयातीत 10 टक्के कपात करण्याचे लक्ष्य

भारताच्या इंधन (विशेषत: तेल) उपभोगातील विक्रमी वाढ लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी सांडपाणी ते पिकांचे अवशेष यापासून जैवइंधन तयार करून ते डिझेल आणि पेट्रोल यात मिश्रण(ब्लेंड) करून वापरण्याचा विचार करीत आहेत. देशातील इंधनाची वाढती मागणी लक्षात घेऊन या उपायाद्वारे सरकार 2022 पर्यंत इंधन आयात 10 टक्के कपात (बचत) करण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. परिणामी जैविक इंधन उत्पादन उद्योग सरकारच्या पाठिंब्यावर आपली बाजारपेठ 15 कोटी डॉलरनी विस्तारण्याचा विचार करीत आहे.