Fri, Aug 23, 2019 21:54होमपेज › Kolhapur › ‘अन्‍नसुरक्षा दला’ची राज्यात लवकरच स्थापना

‘अन्‍नसुरक्षा दला’ची राज्यात लवकरच स्थापना

Published On: Mar 06 2018 12:38AM | Last Updated: Mar 05 2018 10:53PMनानीबाई चिखली : भाऊसाहेब सकट 

राज्यातील शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या थांबवण्यासाठी कर्जमाफी ही  शाश्‍वत उपाययोजना नाही. तर अभिनव आणि व्यावहारिक दृष्टीकोनातूनच शेतकर्‍यांचे उत्पन्‍न कसे वाढेल आणि शेतकर्‍यांचा आर्थिकस्तर कसा उंचावेल यासाठी राज्य शासन केरळ राज्याच्या धर्तीवर ‘अन्‍न सुरक्षा दलाची’ स्थापना करणार आहे.

अन्‍न सुरक्षा दल ही संकल्पना अतिशय उपयुक्‍त असून त्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. अन्‍न सुरक्षादल (आर्मी), कृषी उपकरणे सेवा व दुरुस्ती केंद्र, कृषी यंत्राच्या सेवा व दुरुस्तीसाठीची मोबाईल युनिट ही नावीन्यपूर्ण मॉडेल आहे. सध्या देशामध्ये केरळ कृषी विद्यापीठामार्फत अन्‍न सुरक्षा दल ही संकल्पना राबवण्यात येत आहे. केरळ विद्यापीठाने तयार केलेले कृषी तंत्रज्ञानावर आधारित नवीन मॉडेल महाराष्ट्रातही यशस्वीपणे राबवण्यासाठी केरळ विद्यापीठाचे सहकार्य घेतले जाणार आहे.

केरळ कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आर.चंद्राबाबू यांच्याशी महाराष्ट्र राज्याचे वित्त, नियोजन व गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी चर्चा केली आहे. केरळ विद्यापीठाच्या वतीने चालविल्या जाणार्‍या मनुठ्ठी येथील कृषी संशोधन केंद्राला त्यांनी भेट देऊन विद्यापीठाच्या उपकरण तंत्रज्ञानातील नव्या संशोधनांची माहिती घेतली. अन्‍न सुरक्षा दल संकल्पना व उपकरणांचा वापर तसेच राबवण्यात येत असलेल्या विविध संशोधन प्रकल्पांचा  शेतीमधील उत्पन वाढीसाठी  मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे राज्यात प्रथम प्रायोगिक तत्त्वावर दोन जिल्ह्यांमध्ये अन्‍न सुरक्षा दल व कृषी यंत्र उपकरणे सेवा व दुरुस्ती केंद्र सुरू केली जाणार आहेत. ‘अन्‍न सुरक्षा दल’ योजनेमुळे शेतकर्‍यांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी मदत होणार आहे, असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले.

अन्‍न सुरक्षादल ही संकल्पना चांगली आहे . नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळू शकेल; पण शासनाकडून  त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे केल्यास ही योजना नक्‍कीच शेतकर्‍यांच्या फायद्याची ठरेल, अशी अपेक्षा आहे .    - आर. डी. पाटील, जिल्हाध्यक्ष, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना.