Tue, Apr 23, 2019 21:31होमपेज › Kolhapur › आगीमुळे पर्यावरणाची अपरिमित हानी

आगीमुळे पर्यावरणाची अपरिमित हानी

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 11 2018 1:03AMआजरा : वार्ताहर  

आजरा तालुक्यात शेतकरीवर्गाने शेतातील पालापाचोळा, गवत, झुडपे काढून शेत स्वच्छ करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. स्वच्छ करण्यासाठी एकत्रित केलेला पालापाचोळा, गवत, झुडपे यांना आग लावली जात आहे. मात्र, ही आग लावल्यानंतर शेजारील व रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांची काळजी घेतली जात नाही. परिणामी मोठमोठे वृक्ष आगीच्या भक्षस्थानी पडत असून यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

वृक्षलागवडीसाठी शासनाकडून मोठे प्रयत्न होताना दिसतात. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून वृक्ष लावले जातात. सर्व शासकीय विभाग तथा सामाजिक संस्था, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देऊन ते पूर्ण करून घेण्यामागे शासन प्रयत्नशील असते. लावलेल्या झाडांचे काही प्रमाणात संगोपनही केले जाते. एकीकडे हे चित्र असले तरी दुसरीकडे मात्र दरवर्षी प्रत्येक उन्हाळ्यात हजारो झाडांचा बळी जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

जंगलांसह खासगी शेतजमिनीला अज्ञातांकडून मोठ्या प्रमाणात वणवे लावले जात आहेत. वणवे का व कोण लावताहेत? या प्रश्‍नाचे उत्तर मात्र नेमकेपणाने कोणीही सांगू शकत नाही. फक्त एवढेच की, जंगल परिसरात पार्ट्या करण्याकरिता जाणारी तरुणांची टोळकी व प्रेमालाप करण्यासाठी गेलेली जोडपी धूम्रपान करून थोटके वाळलेल्या गवतावर बिनदिक्‍कत फेकून देतात. धूम्रपान करण्यासाठी पेटविण्यात आलेली काडी किंवा अर्धवट जळालेली सिगारेट सुकलेल्या गवतावर टाकल्याने जंगलातील वणव्याच्या घटना वाढत असल्याचे सांगण्यात येते. ही लागलेली आग मात्र काहीवेळा हवेमुळे पसरते व मोठ्या प्रमाणावर वृक्ष व वनसंपदेची हानी करते. महिनाभरात अनेक वणव्याच्या लहान-मोठ्या घटना घडल्या आहेत. 

कडकडीत उन्हामुळे झाडांचा पालापाचोळा, गवत वाळलेले आहे. त्यावर एक ठिणगी पडण्याचा अवकाश, लागलीच आग प्रज्वलित होते. आग लागल्यावर जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळणार्‍या प्राण्यांच्या पावलांसोबत आग अन्यत्र पसरते. मात्र, जंगलांसह खासगी क्षेत्रात पालापाचोळा जाळण्याकरिता लावलेली आग अन्यत्र पसरल्याने त्यामध्ये लाखमोलाची झाडे जळत असून पर्यावरणाचे नुकसान होत आहे. आजरा-गडहिंग्लज यासह अन्य मार्गावर मोठ्या प्रमाणात वृक्ष जळालेल्या अवस्थेत दिसून येतात. आजर्‍याजवळील व्हिक्टोरिया ज्युबिली पुलाजवळील रस्त्याच्या दोन्ही बाजूंची झाडे जळालेल्या अवस्थेत दिसून येतात. रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात आगी लावण्याचे प्रकार केल्याने मोठे वृक्ष आगीच्या भक्षस्थानी पडत आहेत. 

Tags : Kolhapur, Environmental, unlimited, loss, fire