Thu, Jun 20, 2019 00:31होमपेज › Kolhapur › जयंती नाला पाहून पर्यावरणमंत्री अवाक्

जयंती नाला पाहून पर्यावरणमंत्री अवाक्

Published On: Jul 03 2018 1:51AM | Last Updated: Jul 03 2018 1:18AMकोल्हापूर ः प्रतिनिधी 

राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी दुपारी अचानक जयंती नाला येथे जाऊन पाहणी केली. नाल्याच्या बंधार्‍यावर अडकलेल्या प्लास्टिक पिशव्या आणि थर्माकोल व इतर साहित्य पाहून पर्यावरणमंत्री अवाक् झाले. 

सांडपाणी प्रक्रिया केंद्राचीही पाहणी केली. त्यानंतर एकूणच जयंती नाल्यावरील कुचकामी यंत्रणा आणि पंचगंगा नदीत मिसळणारे सांडपाणी पाहून मंत्री कदम यांनी महापालिकेचे जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना चांगलेच धारेवर धरले. 

मंत्री कदम यांनी कोल्हापूर दौरा जाहीर केला नव्हता. त्यामुळे महापालिका अधिकारी गाफील होते. दुपारी एकच्या सुमारास मंत्री कदम हे जयंती नाल्यावर आले. त्यांच्यासोबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी होते. त्यांनी जल अभियंता कुलकर्णी यांना बोलावून घेतले. कदम यांनी कुलकर्णी यांच्याकडून जयंती नाल्यातून किती सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळते? त्यातील मैलामिश्रीत सांडपाणी किती? एकूण किती सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते? प्रक्रिया केलेले सांडपाणी कुठे सोडले जाते? आदींची माहिती घेतली. त्यामुळे कुलकर्णी यांचीही भंबेरी उडाली. 

कुलकर्णी यांनी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. परंतु, कदम यांनी जयंती नाल्यावरील बंधार्‍याचा फळ्या का काढल्या? असे म्हणून कुलकर्णी यांना चांगलेच खडसावले. यावेळी कदम यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्यासह इतर उपस्थित होते.