Tue, Jul 23, 2019 10:27होमपेज › Kolhapur › डॉल्बीमुक्‍त गणेशोत्सवासाठी प्रबोधन करा : नांगरे-पाटील

डॉल्बीमुक्‍त गणेशोत्सवासाठी प्रबोधन करा : नांगरे-पाटील

Published On: Sep 05 2018 2:13AM | Last Updated: Sep 05 2018 2:13AMकोल्हापूर : प्रतिनिधी

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह सामाजिक क्षेत्रातील घटकांना विश्‍वासात घेऊन जिल्ह्यात डॉल्बीमुक्‍त गणेशोत्सवासाठी प्रबोधन करण्याचे आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी मंगळवारी केले. सामाजिक क्षेत्रातील व्यक्‍तींची गणेशोत्सव, मोहरम, नवरात्रौत्सवात विशेष पोलिस अधिकारी म्हणून नियुक्‍तीच्या त्यांनी सूचना केल्या. 

गणेशोत्सव, मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकार्‍यांची पोलिस मुख्यालयात सायंकाळी बैठक झाली. त्यावेळी नांगरे-पाटील बोलत होते. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे, श्रीनिवास घाडगे यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय पोलिस अधिकारी यावेळी उपस्थित होते. चार तास चाललेल्या बैठकीत विशेष पोलिस महानिरीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणेनिहाय शांतता-सुव्यवस्था व प्रतिबंधात्मक कारवाईचा आढावा घेतला.

नांगरे-पाटील म्हणाले, डॉल्बीमुक्‍तीसाठी कोल्हापूर परिक्षेत्रात दोन वर्षांपासून केलेल्या प्रबोधनामुळे संपूर्ण जिल्ह्यात डॉल्बीमुक्‍त गणेशोत्सव साजरा झाला. कोल्हापूर जिल्ह्यातही गतवर्षी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ही परंपरा यापुढेही कायम ठेवण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह समाजातील घटकांनी पुढाकार घ्यावा.

डॉल्बीमुक्‍तीसह रचनात्मक कार्य करणार्‍या सामाजिक संस्था, संघटनासह व्यक्‍तींचा जिल्हा पोलिस दलातर्फे गौरव करण्यात येईल. उत्सव काळात हुल्लडबाजी करणार्‍यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारत असताना चोरी, घरफोडी, चेनस्नॅचिंगच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घ्यावी.
 पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सराईत गुन्हेगारांवरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी झालेल्या चर्चेत पोलिस उपअधीक्षक (गृह) सतीश माने, पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे, आर. आर. पाटील, प्रशांता अमृतकर, सूरज गुरव,अनिल कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे तानाजी सावंत, आदींनी सहभाग घेतला.